स्मशानभुमीत गर्दी करणे, नातेवाईकांना भेटणे पडू लागलेय महागात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

स्मशानभूमीत एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी गर्दी झाल्यास त्यात कोरोनाचा लक्षणे असलेला रुग्ण तेथे उपस्थित असल्यास धोका वाढू शकतो.

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार अथवा बारा दिवसात त्याच्या नातेवाईकांना भेटायला जाणे ही आपल्याकडे प्रथा आहे. अर्थात त्यात वावगेही काही नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात स्मशानभुमीत गर्दी करणे अथवा नातेवाईकांना भेटायला जाणे ही बाब महागात पडू लागली आहे. 

स्मशानभुमीत मोठ्या प्रमाणावर गर्दी करणे कोरोनाला निमंत्रण देण्याचा प्रकार असून इचलकरंजी येथे वृद्धाच्या अंत्यसंस्कारावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि त्यावेळी उपस्थित असलेल्यांना क्वारंनटाईन व्हावे लागले. कोल्हापुरातही अंत्यसंस्कार अथवा रक्षा विसर्जनावेळी मोठ्या संख्येने हजेरी लावण्याची प्रथा आहे. नाही गेलो तर लोक काय म्हणतील या भितीपोटी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळा, असे आवाहन केले जात आहे.

स्मशानभूमीत एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी गर्दी झाल्यास त्यात कोरोनाचा लक्षणे असलेला रुग्ण तेथे उपस्थित असल्यास धोका वाढू शकतो. लॉकडाऊनच्या काळात स्मशानभुमीतील गर्दी निश्‍चितपणे कमी झाली. मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडू लागले. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेली तशी गर्दी वाढू लागली आहे. अंत्यसंस्कार चुकले तर रक्षाविसर्जनासाठी लोक गर्दी करतात. 

दुःखाच्या प्रसंगावेळी सांत्वनासाठी जाणे यात काही गैर नाही. मात्र स्मशानभूमीत सोशल डिस्टंन्स राखले जातेच, असे नाही. अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडण्यास किमान पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागतो. नंतर मृत व्यक्तीच्या वारसांना भेटण्यासाठी गर्दी होते. तेथेही सोशल डिस्टंन्स राखले जात नाही. रक्षाविसर्जनावेळीही पुन्हा अशीच स्थिती निर्माण होते. 

समुह संसर्गाचा धोका अधिक 
एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास पीपीई कीट घालूनच अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यावेळी लोक गर्दी करू लागले तर अडचणी निर्माण होणार आहेत. समूह संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 
अंत्यसंस्कार अथवा रक्षाविसर्जन चुकल्यास बारा दिवसात केव्हाही सांत्वनाला जाण्याची जुनी प्रथा आहे. त्यावेळी एकाचवेळी लोकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो. अशा स्थितीत किमान संकट कमी होईपर्यंत तरी स्मशानभूमीत जाणे टाळावे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowding the cemetery