किटवाड धबधब्यावर बंदी झुगारून गर्दी

अशोक पाटील
Wednesday, 23 September 2020

किटवाड (ता. चंदगड) येथील धबधब्यात रविवारी एका पर्यटकाला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धबधब्याकडे बंदी घातली असतानाही ती झुगारून, स्थानिक लोकांचा विरोध डावलून येणाऱ्या पर्यटकांवर प्रशासन आतातरी नियंत्रण घालणार का, असा प्रश्‍न येथील नागरिकांतून विचारला जात आहे. 

कोवाड : किटवाड (ता. चंदगड) येथील धबधब्यात रविवारी एका पर्यटकाला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धबधब्याकडे बंदी घातली असतानाही ती झुगारून, स्थानिक लोकांचा विरोध डावलून येणाऱ्या पर्यटकांवर प्रशासन आतातरी नियंत्रण घालणार का, असा प्रश्‍न येथील नागरिकांतून विचारला जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनस्थळांवरील बंदी कायम असताना किटवाड धबधब्याकडे मात्र पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे काही अतिउत्साही पर्यटक दारू पिऊन नाच-गाणे करत आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा याला विरोध आहे, पण शासकीय यंत्रणेची साथ न मिळाल्याने धबधब्याकडे गर्दी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धबधबा कर्नाटक हद्दीजवळ असल्याने सीमाभागातील पर्यटकांची मोठी गर्दी होते. स्थानिक लोकांनी या पर्यटकांना मज्जाव केला आहे.

कोरोनाचे संकट वाढत असल्याने पर्यटनाच्या निमित्ताने गावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांत भीती आहे. दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातल्याचा फलक गावच्या वेशीत लावला, तरीही दररोज पर्यटक धबधब्याकडे येत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांबरोबर वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.

गावच्या पश्‍चिमेला लघुपाटबंधारे धरण क्रमांक एक आहे. या धरणाच्या सांडव्यातून वाहते पाणी धबधब्याकडे जाते. सांडव्यात झिगझॅग आकाराचे दगडी भिंत बांधली आहे. त्यामुळे पर्यटक या सांडव्यात अंघोळ करुन आनंद लुटताना दिसतात. सांडव्यावर लोखंडी ब्रिज बांधले आहेत.

पुलाखालून जाणारे पाणी खोल दरीत कोसळते. धरण क्षेत्रात पर्यटकांसाठी कुठेही संरक्षण नाही. सांडव्याच्या पाण्याखालील दगडांना शेवाळ आल्याने धोका अधिक आहे. सांडव्याचे पाणी प्रवाहित असल्याने पाण्यात पडलेली व्यक्ती धबधब्यातून खाली पडते. रविवारी बेळगाव येथील पर्यटकाच्या बाबतीतही तसाच प्रकार घडल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन पर्यटकांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे. 

कडक धोरण राबविण्याची गरज 
दै. "सकाळ'मधून 12 ऑगस्टच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिध्द करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोकांनीही या बातमीच्या आधारावर पर्यटकांना मज्जाव केला होता, पण पुन्हा काही दिवसाने पर्यटकांनी गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी आता कडक धोरण राबविण्याची गरज आहे.

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds At Kitwad Falls Kolhapur Marathi News