कोरोना महामारीत ही खरेदीला सोन्याचे दिवस : कॅशबॅक, ऑनलाईन ऑफर्सचा धुरळा

लुमाकांत नलवडे
Monday, 26 October 2020

सोने-चांदी, स्मार्ट फोन, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूला मागणी ः दहा पासून पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत सूट, ऑनलाईन खरेदीवरही भर 

कोल्हापूर : कोरोना महामारीची मरगळ झटकून ग्राहकांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहुर्तावर खरेदीसाठी गर्दी केली होती. सोन्या-चांदीच्या दागिण्यासह स्मार्ट फोन, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहने, सायकली खरेदीवर भर दिल्याचे दिसून आले. कोरोना महामारीमुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांना अपेक्षीत व्यवसाय होईल अशी अपेक्षा नव्हती. विशेष करून दुपारी तीन नंतर रात्री नऊ पर्यंत बाजारात गर्दीच गर्दी दिसत होती. 

सोन्याच्या दागिण्यावर मजुरीत 40 टक्के सूट, हिऱ्याच्या दागिण्यावर मजुरीत 100 टक्के सुट, पंचवीस हजाराच्या खरेदीवर 2 हजार 800 रुपयांची पैठणी भेट अशा एक ना अनेक ऑफर्सचा धमाका होता. त्यामुळे शहरातील प्रमुख ब्रॅण्डेड सराफ पेढ्यांमध्ये काल सायंकाळी तीन-चार फुटांचीही जागा रिकामी नव्हती. जोडव्यांपासून ते हिऱ्यांच्या दागिण्याच्या खरेदीपर्यत ग्राहकांची पसंती होती.

मजुरीवर 40 ते 100 टक्‍क्‍यापर्यंत डिस्काऊंट असल्यामुळे तेथे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. अशाच प्रकारे गुजरीतील सराफ कट्ट्यांवरही छोट्या-मोठ्या पेढ्यांवर दिवसभर ग्राहकांचा राबता सुरू होता. सायंकाळी ही गर्दी अधिक झाली होती. मात्र गुजरी परिसरातील पार्किंगची वाहने काढण्यासाठी पोलिसांची फौज रस्त्यावरून फिरत होती. शाही दसऱ्याच्या पालखी आणि सोहळ्यात अडथळे येवू नयेत यासाठी ही व्यवस्था केली जात होती. 

हेही वाचा- दोन तासांच्या थरारानतंर दोनशे फुट खोल दरीतुन श्रीकांतला बाहेर काढण्यात आले यश -

तसेच इलेक्‍ट्रीक वस्तूंमध्ये एलसीडी, होम थिअटर, रेफ्रिजरेटर यांच्यासह पिठाच्या घरगुती गिरणीच्या खरेदीवर ही सूट होती. पंधरा हजारांची गिरणी दहा हजारांपर्यंत दिली जात होती. शिवाजी स्टेडियम परिसरातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवेळी ग्राहकांसाठी मंडपाची व्यवस्था केली होती. टेंम्पोसह इतर वाहनधारकांची रांग काही दुकानांसमोर लागल्याचे दिसत होते. 

कॅशबॅक आणि ऑनलाईन 
ऑनलाईनवर खरेदीसाठी भरघोस डिस्काउंट होता. इतरवेळी 17 हजार रुपयांना मिळणारे वॉशिंग मशिन ऑनलाईवर 13999पर्यंत उपलब्ध झाले होते. पेटीएमसह इतर ऑनलाईन माध्यमातून खरेदी केल्यास 5 ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक ऑफर होती. त्यामुळे ऑनलाईनवरही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मात्र त्यांच्या उलाढालीचा एकूण आकडा मिळू शकला नाही. 

हेही वाचा-इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याने पालिकेसमोरच घेतले पेटवून

 

अपेक्षा पन्नास टक्के व्यवसाय होईल, अशा होती. मात्र प्रत्यक्षात तो 75 टक्‍क्‍यांहून अधिक गेला. पाऊस नसल्यामुळेही ग्राहकांचा उत्साह होता. कोरोना महामारीचा कोणताही परिणाम मुहुर्ताच्या खरेदीवर दिसून आला नाही. मार्केट पुन्हा नेहमी प्रमाणे सुरू झाले आहे. दिवाळीत इलेक्‍ट्रॉनिक व्यवसायात आणखी वाढ होईल, असा विश्‍वास आहे. 
मुग्धा कुलकर्णी (सारस इलेक्‍ट्रॉनिक्‍स) 
 
पाच कोटींची उलाढाल 
दुचाकी वाहनांत 6जी च्या बदलामुळे त्यांच्या किंमतीत सुमारे 10 ते 15 हजारापर्यंत वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळेही दसऱ्यात सर्व दुचाकी वाहनांची मिळून हजार वाहने खरेदी होतील, असा अंदाज व्यावसायिकांचा होता. मात्र जिल्ह्यात एकूण सुमारे दोन हजार वाहनांची खरेदी झाली आहे. एकंदरीतच काल एकाच दिवसात 5 कोटींहून अधिक उलाढाल केवळ दुचाकी ऍटोमोबाइल सेस्टर मध्ये झाली आहे. 
नितीन गायकवाड (विक्री अधिकारी -युनिक ऍटोमोबाइल्स्‌) 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds for shopping on the Dussehra festival