
कोल्हापूर - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवार (ता.20) पासून सलग सात दिवस जिल्ह्यात संचारबंदी कडक केली जाणार आहे. त्यासाठीची नियमावली आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात येणारी व जिल्ह्याबाहेर जाण्यास प्रवासी व वाहनांना तसेच लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस आदी कार्यक्रमांना प्रतिबंध राहणार आहे. त्याशिवाय दूध व औषधे आणण्यासाठी सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेतच जाता येणार आहे.
दरम्यान, संचारबंदी काळात ग्रामीण भागातील शेतीची कामे सुरू राहतील. अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त दहा नातेवाईक किंवा नागरिकांना हजर राहता येणार आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनांमध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी व आस्थापनांनी पूर्णवेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर आदी बंधने पाळणे आवश्यक आहे.
बंदी आदेशातून सूट दिलेल्या अत्यावश्यक सेवा व आस्थापना
1) सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, औषधे व हॉस्पिटल संलग्न सेवा.
2) बॅंक एटीएम, कॅश रिप्लेनिशिंग एजन्सी (सीआरए) ची कामे सुरू राहतील.
3) मा. न्यायालये व अत्यावश्यक सेवेतील राज्य व केंद्र सरकारी कार्यालये कमीत कमी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
4) वृत्तपत्रे, नियतकालिकांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच प्रिंट व डिजीटल मीडियाची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरू राहतील.
5) सर्व वैद्यकीय, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व ऍम्बुलन्स यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळ्या पास किंवा परवानगीची गरज नाही.
6) पेट्रोल-डिझेल फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील व शासकीय धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठीच सुरू राहतील.
7) वृध्द व आजारी व्यक्तींकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरू राहतील.
जीवनावश्यक सेवा व आस्थापना
1) दूध संकलन, वाहतूक सकाळी पाच ते नऊ आणि सायंकाळी चार ते सातपर्यंत सुरू राहील.
2) किरकोळ दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत सुरू राहील.
3) एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहतील.
4) ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहतील.
5) दूरध्वनी, इंटरनेट व बॅंक एटीएम संबंधीत आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहतील.
6) वंदे भारत योजनेंतर्गत वापरात असलेली हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरणासाठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती सुरू राहतील.
उद्योगधंदे
1) कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागातील सर्व उद्योगधंदे बंद राहतील. परंतु ज्या उद्योगधंद्यात व बांधकाम साईटवर कामगारांना पूर्णवेळ राहणेची सोय आहे, असे कामगार व त्या उद्योगातील माल वाहतूक बाहेर न करण्याच्या अटीवर असे उद्योग व बांधकामे सुरू ठेवण्यास परवानगी असेल. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना पंचवीस टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
2) ग्रामीण भागातील एमआयडीसी किंवा खाजगी किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व औद्योगिक आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आस्थापना पन्नास टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.