द्राक्षबागा उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर

युवराज पाटील
Saturday, 17 October 2020

यंदाही परतीच्या पावसामुळे शिरोळ तालुक्‍यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुरवातीला छाटणी घेतलेल्या बागांचे नुकसान झाले.

दानोळी : यंदाही परतीच्या पावसामुळे शिरोळ तालुक्‍यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुरवातीला छाटणी घेतलेल्या बागांचे नुकसान झाले. यंदा छाटण्या उशिरा घेऊनही या पावसाच्या तडाख्याने व प्रतिकूल हवामानाने बागा रोगाला बळी पडत आहेत. संततधार पावसामुळे औषध फवारणी करण्यातही अडचण निर्माण होते. त्यामुळे गेल्या वर्षी आणि यंदा द्राक्ष बागायतदार नुकसानीत आले आहेत. लाखो रुपये खर्च करून व रात्रीचा दिवस करूनही बागा हातातून जातात. त्यामुळे द्राक्ष बागायतदार लहरी निसर्गापुढे हतबल झाला आहे. बागा वाचविण्याची शेतकऱ्यांची ही धडपड परतीच्या पावसापुढे फोल ठरली. 

आगाप छाटणी झालेल्या बागा फ्लवरिंग स्टेजला आहेत. त्यामुळे घड तयार होतानाच दावण्याचा प्रादुर्भाव त्यावर होतो. घड कुजून जात आहेत. मागास छाटणी झालेल्या बागांमध्ये घड पोंगा व पहिल्या, दुसऱ्या डिपिंगच्या अवस्थेत असलेल्या बागेतील बुरशी व घडावर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच घड विरघळण्याचे प्रमाण वाढले. वांझ काढण्याच्या स्थितीत असलेल्या बागांच्या काडीला बॅक्‍टेरिया करपाचा फटका बसत आहे.

जास्त पाण्याने मुळांची कार्यक्षमता कमी होऊन झाडे अशक्त होतात. तसेच, बागेत पाणी साचल्याने ट्रॅक्‍टरने औषध फवारणी अवघड झाली आहे. रोगाच्या प्रादुर्भावावर उपायासाठी एसटीपीनेही फवारणी अशक्‍य असून, डस्टींग मशिनद्वारे पावडरची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. द्रव औषधाच्या चौपट पावडरची फवारणी करूनही, त्याला अपेक्षित यश येताना दिसत नाही. 

बागायतदारास उघडिपीची प्रतीक्षा 
रोग नियंत्रणात आणण्यासाठी पावसाने थोडी उसंत दिली तरी शेतकरी औषध फवारणी करीत आहेत. त्यासाठी केव्हा एकदा सूर्याचे दर्शन होते, आणि फवारणी करतोय, अशी परिस्थीती बागांमध्ये दिसत आहे. 

परतीच्या संततदार पावसाने औषध फवारणीलाही वेळ मिळेनासा झाला आहे. उशिरा छाटणी घेऊनही प्रतिकूल हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. उपाययोजना करूनही रोग नियंत्रणात येईना. 
- सुनील चौगुले, द्राक्ष बागायतदार

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage To Vineyards Due To Rains Kolhapur Marathi News