परंपरा कोल्हापूरची; १२० वर्षांपूर्वीच्या आठवणींना पुन्हा उजाळा,  प्रजेचा सन्मान जपणारा शाही दसरा..!

संभाजी गंडमाळे
Sunday, 25 October 2020

सामाजिकतेची किनार लाभलेली करवीर संस्थानची ही परंपरा बदलत्या काळात आजही कायम असून, यंदा मात्र

कोल्हापूर : इथला शाही दसरा सोहळा म्हणजे सामाजिक समतेचा जणू उत्सवच. मेबॅक गाडीतून राजे प्रजेला सोनं वाटतात आणि सोन्यासारखं राहण्याच्या शुभेच्छा देतात. सिद्धार्थनगर परिसरातही ते सोनं देण्यासाठी जातात. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात तर विविध समाजघटकांना देवीच्या सेवेत सामावून घेतात... सामाजिकतेची किनार लाभलेली करवीर संस्थानची ही परंपरा बदलत्या काळात आजही कायम असून, यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाही दसरा सोहळा होणार नाही. 

दरम्यान, यानिमित्ताने एकशे वीस वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी प्लेगच्या साथीवेळी घेतलेले विविध निर्णय, जाहीर केलेले जाहीरनामे, क्वारंटाईन (स्थानत्याग), प्रजेचे प्रबोधन, प्लेग निवारणासाठी ॲक्‍शन प्लॅन, उपचारासाठी दवाखाने, देशातील पहिला सार्वजनिक होमिओपॅथी दवाखाना या साऱ्या गोष्टींना पुन्हा उजाळा मिळतो आहे. विजया दशमी दसऱ्यादिवशी भवानी मंडपात बंदुकीची फैर झडली की, तुळजाभवानीची दसरा चौकातील तत्कालीन चौफाळ्याच्या माळाकडे शाही दसरा सोहळ्यासाठी यायची. त्याचा थाटही काही औरच असायचा.

नारळीच्या झावळ्यांनी सजलेल्या बैलगाड्या, भगव्या ध्वजाच्या हत्तीमागे तोफखान्यातील तोफा, तोफांच्या मागे जरीपटक्‍याचा हत्ती, अश्‍वपथक, वाद्यवृंद, बहिरी ससाण्याची जोडी, शिकारी कुत्र्यांसह चित्ते असा भला मोठा हा ताफा म्हणजे करवीर संस्थांनच्या सामर्थ्याचे दर्शनच यानिमित्ताने घडायचे. पूर्वीचा पालखीचा मार्ग वेगळा. मात्र, बदलत्या काळात हा मार्ग आणि सोहळ्याचे स्वरूप बदलले असले तरी ‘प्रजेचा सन्मान जपणारा सोहळा’ ही या सोहळ्याची ओळख आजही कायम आहे आणि म्हणूनच प्रजेच्या आरोग्याची दक्षता म्हणूनच यंदा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र, परंपरेप्रमाणे धार्मिक विधी मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. 

हेही वाचा- पुण्यातील 52 कोटींच्या जीएसटी घोटाळ्यात सांगलीचा सूत्रधार की प्यादे? -

 

क्रांतिकारी निर्णय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानच्या तुळजाभवानी मंदिरातील विविध सेवांचा मान तत्कालीन परिस्थितीतही समाजातील विविध समाजघटकांकडे दिला. जाती-पातीचे निर्मूलन हाच त्यांचा या निर्णयामागचा उद्देश. आजही विविध समाजातील पुढच्या पिढ्या ही सेवा इमाने-इतबारे करीत आहेत. दसरा चौकात शाही दसरा सोहळा साधारणपणे १८८९ मध्ये सुरू झाला. तत्पूर्वी, हा सोहळा टेंबलाई टेकडी परिसरातील मोकळ्या माळावर व्हायचा.

थरार अन्‌ शुभेच्छा
मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने सीमोल्लंघनाचा सोहळा होतो. तत्पूर्वी, श्री अंबाबाई, तुळजाभवानी, गुरूमहाराज वाड्यातील पालख्या दसरा चौकात येतात. करवीर संस्थानचे गीत वाद्यवृंदाद्वारे सादर केले जाते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती आदींच्या उपस्थितीत शमीच्या पानाचे पूजन होते. त्यानंतर इशाऱ्याची बंदूक झडते व शमीची पाने (सोनं) लुटण्याचा कार्यक्रम होतो. यानिमित्त किमान दहा मिनिटांचा थरार अनुभवायला मिळतो. मात्र, त्यानंतर लगेचच हा थरार थांबतो आणि एकमेकांना सोनं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dasara Tradition of Kolhapur Revive the memories of 120 years ago