नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा रद्द 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार धार्मिक कार्यक्रम 

नृसिंहवाडी (कोल्हापूर) :  येथे श्री दत्त जयंती उत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाने रद्द करण्यात आली आहे. श्री दत्त मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्‍याच हक्कदार मानकरी मंडळींच्या उपस्थितीत होणार आहेत, अशी माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी, सचिव गोपाळ पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी विश्वस्त विकास पुजारी, गुंडो पुजारी, श्रीपाद पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही दत्त महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असून, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात आदी अनेक राज्यांतून श्री दत्त भक्त व भाविक श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी नृसिंहवाडी येथे येत असतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने इचलकरंजी येथील प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळचे तहसीलदार अपर्णा मोरे, पी. आय. कुंभार व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी मंगळवार (ता. 29)चा श्रीदत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. 

भाविकांना न येण्याचे आवाहन 
जयंती दिवशी नृसिंहवाडीत व मंदिरात कोणालाही सोडले जाणार नाही. शिवाय, मिठाई व्यापारी पेठेतील दुकाने पूर्णपणे बंद राहतील. त्या दिवशी दत्त मंदिरातील सायंकाळी होणारा श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. जन्मकाळ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लोकल केबल व देवस्थानच्या यू ट्यूब चॅनलवर प्रसारित होईल. कोणाही भाविकांनी त्यादिवशी नृसिंहवाडीत येऊ नये, असे आवाहन देवस्थान प्रशासनाने केले आहे. 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Datta Jayanti celebrations at Narsinhwadi canceled