रंकाळ्यात आढळले मृत पक्षी: महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क 

सुयोग घाटगे 
Friday, 15 January 2021


उत्तरीय तपासणीसाठी पाठवले पुण्याला 

कोल्हापूर  :  रंकाळा तलावाच्या पूर्वेकडील बाजूला असणाऱ्या किनाऱ्यावर दोन पक्षी मृतावस्थेत आढळले. बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर रंकाळा परिसरात मृतावस्थेत पक्षी आढळल्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क झाली झाली आहे. 
 
  देशभरात बर्डफ्लू ने पक्षी मृत होत असताना सर्वच ठिकाणी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांपासून वारंवार पसरवणाऱ्या अफवांमुळे प्रशासन हतबल झाले आहे. अश्यातच रंकाळा तलावाच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या जुना वाशीनाका परिसरातील काठावर दोन पक्षी मृतावस्थेत आढळून आले. रंकाळा परिसरामध्ये मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या अमर जाधव यांनी याची कल्पना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिली. 

हेही वाचा- शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. बी. पाटील पुरस्कारांचे  वितरण -

आरोग्य विभागा सोबतच वनविभागाची आरोग्य यंत्रणेला देखील पाचारण करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून या पक्षांना उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हे पक्षी परदेशी स्थलांतरित पक्षी असून स्पॉट बिल  म्हणून ओळखले जातात असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

पक्षांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि बर्डफ्लू बाबतची शंकेचे निरसन हे उत्तरीय तपासणीच्या अहवाला नंतरच कळेल. या वेळी मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, वनविभागाचे डॉ.संतोष वाळवेकर, मनपा आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक ,शिवाजी शिंदे,निलेश पोतदार,संतोष आवळे,पर्यावरण विभागाचे केवल लोट आदी उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead birds found in Rankala lake kolhapur