बापरे! भोगावती नदीत हजारो मासे मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

मळीमिश्रित पाणी; नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर

हळदी (कोलहापूर) :  गेल्या जूनमध्ये भोगावती नदीपात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याच्या घटनेनंतर पाच महिन्यांनी पुन्हा एकदा नदीत असेच पाणी मिसळण्याचा प्रकार आज घडला. परिणामी, हजारो मासे मृत्युमुखी पडले. तसेच यामुळे नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.

 

आज पहाटे नदीपात्रातील पाण्याचा रंग काळा होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली. पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर मासे  तडफडत बाहेर यायला लागले. सध्या हळदी बंधाऱ्यावर पाणी अडवल्यामुळे बंधाऱ्याच्या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे श्वास घेण्यासाठी  धडपड करत होते. पृष्ठभागावर मासे तरंगत आहेत हे समजताच परिसरातील लोकांची मासे पकडण्यासाठी झुंबड उडाली. प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे, खेकडे व इतर जलचर मृत्युमुखी पडले. नदीकाठच्या गावांना याच नदीमधून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. भोगावती नदीतील पाणी प्रदूषित होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. परिणामी या प्रकरणाने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

हेही वाचा- पदवीधरांची सेवा करण्याच्या उद्देशानेच निवडणुकीला उभा

 

पाण्याचे नमुने घेतले
पाणी प्रदूषित झाल्याची माहिती समजताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले. आता प्रदूषण नियंत्रण महामंडळ या प्रकरणातील दोषींवर कारवाई करेल का, याकडे नदीकाठच्या गावातील लोकांचे लक्ष लागले आहे.

 

 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead fish in bhogawati river kolhapur