नरेश भोरे आत्मदहन प्रकरण ; चार अधिकार्‍यांसह सहाजणांवर गुन्हा दाखल

पंडित कोंडेकर
Tuesday, 27 October 2020

या सर्वांनी भोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

इचलकरंजी (कोल्हापूर) : सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी चार अधिकार्‍यांसह सहाजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरिक्षक महादेव मिसाळ, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी मारुती पाथरवट व घंटागाडी चालक अमर लाखे यांचा समावेश आहे. 

हेही वाचा -  महापालिकेच्या सभेत पाणी, आरोग्यावरून अधिकारी धारेवर
 

या सर्वांनी भोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार ओंकार गोपाल भोरे (वय 27, रा.रेणूकानगर, यड्राव, ता. शिरोळ) यांनी दिली आहे. घंटागाडीला मृत डुक्कर बांधून फरफटत घेवून जात असल्याची निदर्शनास आल्यानंतर भोरे यांनी त्याला विरोध दर्शविला होता. याबाबत भोरे व घंटागाडी चालक लाखे यांच्यात वादावादी झाली होती. यावेळी लाखे याने भोरे यांना धक्काबुक्की केली होती. तसेच भोरे यांनाच मृत डुक्कर घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते. याबाबत भोरे यांनी लाखे याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पालिका यांना दिले होते. 

हेही वाचा - सीईओ अमन मित्तल झाले संतप्त ; होगाडे प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश -

मात्र ठोस कारवाई न केल्यामुळे भोरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पालिकेच्या पार्किंगच्या प्रवेशव्दारातून आत येऊन भोरे यांनी सोमवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ते गंभीररित्या होरपळले होते. त्यांच्यावर सांगली येथे सीव्हील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नातेवाईक व समर्थकांनी त्यांचा मृतदेह सोमवारी रात्री पालिकेच्या प्रवेशव्दारात ठेवून आंदोलन केले होते. जबाबदार अधिकार्‍यांसह संबंधितांवर गुन्हा नोंद केल्याशिवाय मृतदेह न हलविण्याची भूमिका घेतली होती. अखेर रात्री उशिरा पालिकेच्या चार अधिकार्‍यांसह सहाजणांवर गुन्हा नोंद केल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. त्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the dead social worker naresh bhore four officers with six people registered crime in ichalkaranji kolhapur