
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निक प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश अर्जासाठी उद्या (ता. 5) अखेर मुदत वाढविली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. सोमवारी (ता.7) कच्ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
गडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निक प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश अर्जासाठी उद्या (ता. 5) अखेर मुदत वाढविली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. सोमवारी (ता.7) कच्ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. यावर दहा डिसेंबरला अखेर हरकत घेण्याची मुदत आहे. बारा डिसेंबरला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर अभ्यासक्रम व संस्था निवडीसाठी पसंतिक्रम भरण्याच्या फेऱ्या सुरू होतील.
केंद्रीय पद्धतीने पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा दहावीचा निकाल उशिरा लागला. त्यामुळे दोन महिने उशिरा 10 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रकिया सुरू झाली. कोरोनामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना कोणत्याही संस्थेत न जाता इंटरनेट असणाऱ्या मोबाईल, कॉम्युटरवरून अर्ज भरण्याची सोय केली आहे; पंरतु यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नसल्याने मुदतवाढ दिली होती. त्यातच मराठा आरक्षणाचा पेच झाल्याने ही प्रवेशप्रक्रिया दोन महिने लांबली.
अशा कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. बारावी, आयटीआय, व्होकेशनल उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. त्यासाठी शनिवारअखेर http://poly20.dtemaharashtra.orgया संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी संधी आहे. सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या कच्च्या यादीवर दहा डिसेंबरअखेर हरकत घेण्याची मुदत आहे. बारा डिसेंबरला पक्की यादी लागेल. प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रकातून कळविले आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur