...त्यामुळे कोल्हापूर प्रशासन हडबडले; काय आहे कारण?

Decision to reserve CPR hospital for coronary patients
Decision to reserve CPR hospital for coronary patients
Updated on

कोल्हापूर - अत्यवस्थ रुग्णांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह खासगी रुग्णालयांनीही दाखल करून न घेतल्याने शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाला. त्याने प्रशासन हडबडले आहे. या घटनांची गंभीर नोंद घेत संपूर्ण सीपीआर रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याचा तर शहरातील २७ खासगी रुग्णालयांतील काही बेड कोरोनाग्रस्तांसाठी आरक्षित ठेवण्याचाही निर्णय झाला.

त्या संदर्भातील आदेशही काढण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील २७ खासगी रुग्णालयांतील काही बेड कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. यातील प्रत्येक पाच रुग्णालयांमागे एक याप्रमाणे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. संबंधित रुग्णालयांनी आरक्षित बेडची माहिती महापालिकेच्या वॉररूमला कळवण्याची जबाबदारी संबंधित डॉक्‍टरांसह समन्वयकांवर आहे. 
  
या आदेशाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाखेरीज या २७ रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेणे, या आदेशान्वये बंधनकारक राहणार, असेही आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआर रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर या रुग्णालयातील कोरोना व्यतिरिक्त अन्य आजाराच्या रुग्णांवरील उपचार पूर्ण बंद करून असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज द्यावा तसेच सीपीआर रुग्णालय हे पूर्ण वेळ फक्त कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी यासंदर्भातील आदेश काढले. सीपीआरमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी केवळ २०० बेड आरक्षित होते. प्रत्यक्षात २७२ रुग्ण दाखल होते. गेल्या आठ दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. अशात अनेक रुग्ण सीपीआरमध्ये येत आहेत. त्यांना बेड व उपचारपूरक यंत्रणा अपुरी पडेल, अशी स्थिती आहे. इतर आजारावरील रुग्ण दाखल करून घेतल्याने कोरोनाग्रस्तांना दाखल करून घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे इतर आजारांवरील रुग्णांना डिस्चार्ज देऊन संपूर्ण रुग्णालय कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. 


उपचार शासकीय दरानुसार
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डॉक्‍टरांनी किती दर लावायचे, याची अधिसूचना २१ मे रोजी प्रसिद्ध केली आहे. त्या अधिसूचनेनुसार दाखल होणाऱ्या रुग्णांकडून दर आकारणी करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.

सीपीआरमध्ये २०० अतिरिक्त बेड मिळणार
सध्या सीपीआरमध्ये २७२ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. इतर आजारावरील रुग्णही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. हळूहळू इतर रुग्णांना डिस्चार्ज देऊन सर्वच रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्यात येणार आहे. इतर आजाराचे रुग्ण गेल्यानंतर किमान २०० अतिरिक्त बेड कोरोनाग्रस्तांसाठी 
मिळणार आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com