करनूर शाळेत सोनम वांगचूक यांचा दिल्ली, लडाख पॅटर्न...! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

लडाख पॅटर्ननुसार आता कागल तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या करनूर विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. लडाख आणि दिल्ली पॅटर्ननुसार शिक्षण देणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरणार असून, अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेसह विविध अत्याधुनिक सुविधा शाळेत उपलब्ध झाल्या आहेत.

कोल्हापूर  : आमीर खानचा "थ्री इडीएटस्‌' चित्रपट साऱ्यांनाच भावला. त्यातील त्याची फुनसुख वांगडू ही भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतली. मात्र, चाकोरीबाहेरचे आणि जगावेगळे प्रयोग करणारे प्रत्यक्षातले फुनसुख वांगडू म्हणजे लडाखचे सोनम वांगचूक. त्यांच्याच या लडाख पॅटर्ननुसार आता कागल तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या करनूर विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. लडाख आणि दिल्ली पॅटर्ननुसार शिक्षण देणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरणार असून, अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेसह विविध अत्याधुनिक सुविधा शाळेत उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, लॉकडाउनमुळे अजूनही शाळा सुरू नाहीत. मात्र, तत्पूर्वी सर्व सुविधा शाळेत उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. 
शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील 1917 ची. गेल्या वर्षीच्या महापुरात पंधराहून अधिक दिवस ही शाळा होती आणि साहजिकच पूरग्रस्त शाळा अशी या शाळेची ओळख निर्माण झाली. मात्र, प्रसिद्ध उद्योजक मदनजी मुथ्था, विद्याताई गुंदेचा यांच्याबरोबरच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, स्थानिक प्रशासन, शाळा समितीबरोबरच विविध संस्थांच्या सहकार्यातून आता ही शाळा पुन्हा नव्या नेटाने उभारताना शिक्षणात अंतर्बाह्य बदलाचा विचार साऱ्यांमध्ये पेरणार आहे. इस्रोशी संलग्न असणारीही ही पहिलीच शाळा असून शाळेत डॉ. सी. व्ही. रामण अंतराळ विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. येथे आता लवकरच अत्याधुनिक दुर्बीणही उपलब्ध होणार आहे. खेळांसाठीचे विविध दल उभारले जाणार असून ढोलपथक, बर्ची पथक, लेझीम पथकांचीही स्थापना होणार आहे. 

प्रत्येक रविवारी कार्यशाळा 
शाळेतील सर्व सुविधांचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांनाच घेता येणार आहे. पहिली ते सातवीचे वर्ग शाळेत आहेत. मात्र, प्रत्येक रविवारी कौशल्य व उद्योजकता विकास कार्यशाळा होणार असून त्यासाठी इतर शाळांतील विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाचा विचार रुजावा, यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. 

मदनजी मुथ्था, विद्याताई गुंदेचा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि स्थानिक सर्वच घटकांच्या सहकार्यातून शाळेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात या शाळेतील विद्यार्थी देशाच्या एकूणच जडणघडणीत मोठे योगदान देतील. 
- धनेश बोरा, "इस्रो'चे तरुण संशोधक 

शाळेतील बहुतांश सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून देताना दिल्ली व लडाख पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांचेही आवश्‍यक ते सर्व प्रशिक्षण होणार आहे. 
- के. डी. पाटील, मुख्याध्यापक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi, Ladakh pattern in Karnur school