अत्याधुनिक शेतीच्या माहितीसाठी अनुभवी सल्लागारांना मागणी

सदानंद पाटील
Saturday, 28 November 2020

कोल्हापूर : शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. शेतीचे आधुनिकीकरण हे फक्‍त यांत्रिकीकरणापर्यंतच मर्यादित राहिले नसून, पिकांची पद्धत, काढणीनंतरची प्रक्रिया, विविध व्यावसायिक पिकांचे उत्पादन, कमी कालावधीत जास्त नफा देणारी पिके, उत्पादित मालासाठी चांगली बाजारपेठ शोधण्याकडे कल वाढला आहे. तसेच, कृषी पूरक उद्योग व्यवसायाकडेही कल वाढला. महत्त्वाचे म्हणजे उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण शेतीकडे वाढत चालले असल्यानेच आता शेतीत अनुभवी सल्लागारांची मागणी वाढली आहे. 
 
सल्लागारांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेतीवर सुरू असलेले विविध प्रयोग अत्यंत आश्‍वासक आहेत. 
जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षांत ऊस, भात, सोयाबीन, नाचणी, भाजीपाला या पलीकडे जाऊन उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन हाउस, पॉली हाउसमधून शेती केली जाते. त्या ठिकाणी फुलांच्या शेतीसह विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. या क्षेत्रात काम केलेले लोक आता सल्लागार म्हणून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात काम करीत आहेत. अभ्यासू व शेतीत काही तरी वेगळे करण्याचा मानस असणाऱ्या शेतकऱ्यांना हे सल्लागार मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत. 
वातावरणाचा अभ्यास करून शेती उत्पादनांची निवड करणे, शेतीची प्रतवारी, पिकांची निगा, काढणी व पीक काढणीनंतर त्या पिकाला व उत्पादनाला चांगला भाव मिळेल, या सर्व कामात सल्लागाराची भूमिका महत्त्वाची राहते. काही सल्लागार हे उत्पादनाच्या विक्रीची हमी घेत असल्यानेही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. हमीभावाची खात्री असणाऱ्या सल्लागारांना मागणी वाढली. त्यामुळेच शिरोळमधील ग्रीन हाउस व पॉली हाउसचा ट्रेंड आता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. पूर्वानुभव पाहूनच शेतकरीही सल्लागाराची नेमणूक करीत असल्याने फसण्याची शक्‍यता कमी राहते. 

शेतकऱ्यांना सर्वच बाजारपेठा किंवा पिकांची माहिती नसते. उसाला कंटाळलेल्या लोकांना पर्यायी मात्र आश्‍वासक उत्पादन देणाऱ्या पिकांची आवश्‍यकता असते. विविध पिकांसाठी काम करणाऱ्या सल्लागारांची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात अनुभवी सल्लागार माफक फीमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, सल्ला देत असताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 
- अक्षय पवार, प्रयोगशील उच्चशिक्षित शेतकरी, इस्पुर्ली 

संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for experienced consultants for up-to-date farming information