"राकसकोप'मधील गाळ काढा किंवा भूसंपादन करून भरपाई द्या...'या' आमदारांनी केली मागणी

सुनील कोंडुसकर
शनिवार, 11 जुलै 2020

तिलारी धरण प्रकल्पांतर्गत तीन बंधारे प्रलंबित आहेत. ते बांधून मार्कंडेय नदीच्या माध्यमातून त्याचा उपयोग शेतीच्या पाण्यासाठी केल्यास चंदगड तालुक्‍यातील 15 गावांसह सीमाभागातील गावांना लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

चंदगड : तुडिये (ता. चंदगड) परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी तिलारी प्रकल्पात बाधीत झाल्या आहेत. त्यांना अद्याप पर्यायी जमिनींचा ताबा मिळालेला नाही. त्याशिवाय, राकसकोप जलाशयात अतिरिक्त पाणीसाठा केला जात असल्याने शेतात दीर्घकाळ पाणी साचून नुकसान होत आहे. जलाशयातील गाळ काढावा किंवा जमिनीचे भूसंपादन करून बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. 

पूरस्थितीच्या पार्शभूमीवर मुंबई येथे महाराष्ट्र व कर्नाटकच्या जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक झाली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह प्रमुख मंत्री, अधिकारी उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील यांनी चंदगड तालुक्‍यातील प्रश्‍नांचा आढावा घेऊन ते सोडविण्याची मागणी केली. 

तिलारी धरण प्रकल्पांतर्गत तीन बंधारे प्रलंबित आहेत. ते बांधून मार्कंडेय नदीच्या माध्यमातून त्याचा उपयोग शेतीच्या पाण्यासाठी केल्यास चंदगड तालुक्‍यातील 15 गावांसह सीमाभागातील गावांना लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. कर्नाटक व महाराष्ट्रने एकत्र येऊन संयुक्त करार करावा व निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली.

यासंदर्भात मंत्री जारकीहोळी, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बेळगाव येथे बैठक घेण्याचे मंत्री जयंत पाटील यांनी अभिवचन दिले. या वेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Sludge Removal From "Raksoscope" Kolhapur Marathi News