कोणता आहे हा भयानक आ़जार हाता पायांना येतेय सूज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

डेंगी, चिकनगुण्या निगेटिव्ह; विचित्र आजाराने रामानंदनगर परिसर धास्तावला
 

कोल्हापूर : रामानंदनगर परिसरातील जाधव पार्क, गुरुकृपा कॉलनी, बळवंतनगर आदी परिसरातील रहिवाशांना हाता-पायांना सूज येणे आणि ताप येण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. डेंगी आणि चिकनगुण्या या दोन्ही आजारांची लक्षणे यात दिसत असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. डेंगी किंवा चिकनगुण्याची चाचणी केली तर निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे एकीकडे तज्ज्ञ डॉक्‍टर हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाहीत तर दुसरीकडे आजाराचे निदान होत नाही, अशा दुहेरी कात्रीत सापडलेले नागरिक हैराण झाले आहेत.

सध्या सगळीकडे कोरोनाच्या साथीने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांना किंवा अन्य अत्यवस्थ रुग्णांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. डॉक्‍टरांकडे गेल्यानंतर व्हायरल तापच आहे आणि पावसाळी वातावरणाने ताप येऊ शकतो असे सांगून औषधोपचार करत आहेत; पण कमरेखाली पायात येणारी सूज आणि होणाऱ्या वेदनांमुळे परिसरातील नागरिक, मुले झोपूनच आहेत. काही नागरिकांना पायात सूज आणि कळ आहे; पण ताप येत नाही अशीही स्थिती आहे; परंतु पायातून येणारी कळ असह्य होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

हेही वाचा- शिवाजी विद्यापीठाची बी. एड व एम. एडची डिग्री हवी असेल तर 60 हजार रुपये द्या! काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य -

अनेकांनी भीतीमुळे डेंगी आणि चिकन गुण्याची चाचणी करून घेतली; पण ती निगेटिव्ह येत आहे. स्थानिक डॉक्‍टरांच्या मते हा व्हायरल आजार आहे. पण काही महिन्यांपूर्वी जवळच असलेल्या बालाजी पार्क परिसरातील नागरिकांना अशाच प्रकारे त्रास होत होता. तेव्हाही त्याचे निदान झाले नव्हते, आताही महापालिकेतील आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही; पण स्थानिक नागरिकांनी लोकसहभागाने रिकाम्या प्लॉटमधील गवत आणि डबकी स्वच्छ करून घेतली. पण डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने महापालिकेमार्फ़त परिसरात सर्वेक्षण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

हेही वाचा- कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूत  40 टक्के मृत हृदयरोगाचे -

गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिक पायाला सूज आणि वेदनांनी हैराण आहेत. या आजाराचे निदान होत नाही; पण परिसरातील खुल्या भागात असलेले गवत आणि पाणी साचलेली डबकी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेने परिसर स्वच्छता करून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात.
- आप्पा लाड, स्थानिक रहिवासी

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue chickenpox kolhapur Jadhav Park Gurukrupa Colony Balwant Nagar in Ramanand Nagar area people swollen feet and fever