चांदे रस्त्यावर मृत कोंबड्या नाहीत ; पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.एस.पठण 

सुनील पाटील  
Tuesday, 12 January 2021

परिसरात पसरलेली घाण तात्काळ साफ करण्याबाबत निर्देश देण्यात आले

कोल्हापूर : राशिवडे व चांदे रस्त्यावर 100 हून अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकलेल्या नाहीत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. पठाण यांनी दिली. 

श्री पठाण म्हणाले, राशिवडे व चांदे रस्त्यावर 100 हून अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकले असल्याच्या बातमी मुळे याची चौकशी करण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्वत:मी आणि पशुधन पर्यवेक्षक सुनिल काटकर आणि हसूर दुमाला येथील पशुधन पर्यवेक्षक यांनी गावकऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट देऊन शहानिशा केली. चिकन सेंटरवरील कोंबडीची पिसे, एका मृत कोंबडीचा कुजलेला सांगाडा व एक पांढरे बारदान आढळून आले. हे बारदान उघडून चौकशी केले असता बारदानामध्ये घरातील कचरा, पत्रावळी, द्रोण, चहाचे कप, नारळाच्या शेंड्या व इतर साहित्य आढळून आले. काल रात्री 1.20 ला राशिवडेच्या सरपंचांना घेवून पंचनामा केला. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोंबड्या दिसून आला नाही. परिसरात पसरलेली घाण तात्काळ साफ करण्याबाबत निर्देश देण्यात आले. परिसरातील कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट देवून रोगराई संदर्भात तपासणी व प्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

हे पण वाचा - मांजामध्ये पाय अडकलेल्या बगळ्यास भादवणमध्ये जीवदान

जिल्ह्यात सांसर्गिक रोग निर्मूलन समिती कार्यरत असून पशुसंवर्धन विभागामार्फत पक्ष्यांमधील रोगराई संदर्भात रोग नमुने पाठवून शहानिशा केली जाते. पशुसंवर्धन विभाग शेतकरी, पशुपालक व जनमानसात प्राण्यांपासून होणाऱ्या रोगाबाबत दक्ष असतो. तरी यापुढे प्राण्यांच्या रोगासंदर्भात वृत्तांकन करताना पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून शहानिशा करावी, असे आवाहनही श्री. पठाण यांनी केले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Commissioner of Animal Husbandry Dr YS pathan