'राज्यात रोज पंधरा हजार विवाह सोहळे होतात, पण गुन्हा फक्त माझ्यावरच' 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

सतेज पाटील यांचे राजकारण सूडाचे 
धनंजय महाडिक; गोकुळ, राजाराम कारखाना निवडणुकीवरही भाष्य 

कोल्हापूर :  गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विधान परिषद, विधानसभा सर्वकाही मलाच पाहिजे, अशी पालकमंत्री सतेज पाटील यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यातूनच ते सूडाचे राजकारण करतात. राज्यात रोज पंधरा हजार विवाह सोहळे होतात, पण गुन्हा फक्त माझ्यावरच दाखल झाला, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी गोकुळ, राजाराम कारखाना निवडणुकीवरही भाष्य केले. 

महाडिक म्हणाले, ""माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांनी गोकुळ ही संस्था नावारूपाला आणली. दर महिन्याला गोकुळच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. यामुळेच जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही, पण एवढी चांगली संस्था, त्यांना मोडायची आहे. त्यामुळेच ते गोकुळची निवडणूक बिनविरोध होऊ देत नाहीत. राजाराम कारखान्याचेही असेच आहे. सत्तेचा गैरवापर करत त्यांनी 25 वर्षांपासून मतदान करणाऱ्या सभासदांना अपात्र ठरवले आहे.

सत्यजित कदम यांचा ऊस राजाराम कारखान्याला जातो. ते मतदानही करतात, पण त्यांना अपात्र ठरवले आहे; पण आम्ही या विरोधात उच्च न्यायलात दाद मागितली आहे. तेथे आम्हाला न्याय मिळेल. डी. वाय. पाटील यांच्या कारखान्याचे पूर्वी सहा हजार सभासद होते. आता केवळ 2200 सभासद राहिले आहेत. एवढे कमी सभासद असणारा हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. राज्यात दररोज पंधरा हजार विवाह समारंभ होतात; पण केवळ माझ्या मुलाच्या लग्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला. यामागे कोण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा राजकारणाला जनताच संपवेल.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay mahadik criticize on satej patil political marathi news