धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ; भाजपा महिला मोर्चाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

मुख्यमंत्र्यांनी   धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा  घ्यावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. 

कोल्हापूर - १० जानेवारी पासून रेणू अशोक शर्मा ही महिला सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार तथा लैगिंक अत्याचार विरोधात FIR दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जात आहे. परंतु, पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे संबंधित महिलेने मुंबई पोलिस आयुक्तांनाही निवेदन दिले. परंतु आजपर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. कोणतीही पीडित महिला FIR दाखल करण्यासाठी आली तर त्वरित तक्रार दाखल करावी असे केंद्र सरकारचे निर्देष असताना देखील केवळ राजकीय दबावापोटी ही केस नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा ओरोप करत मुख्यमंत्र्यांनी   धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा  घ्यावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. 

यावेळी  मुंडे यांच्याविरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य नीताताई केळकर म्हणाल्या, केंद्राने कोणत्याही पीडित महिलेची तक्रार त्वरित नोंदवून घेण्याचे निर्देश दिले असतानाही पोलिस आयुक्तांकडे जाऊन देखील तक्रार घेतली जात नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राज्यामध्ये महिला सुरक्षित नसतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. 

भाजपा महानगर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धनंजय मुंडे प्रकरणात काहीही बोलण्यास तयार नाहीत. महाविकास आघाडी सरकारला महिलांच्या प्रश्नाना बाबतीत काही घेणे देणे नाही असे दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षावरही बलात्काराची केस होती त्याच्यावरही महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. यावरून राज्यातील महिलांच्या प्रश्नांबाबतीत हे महाविकास आघाडी सरकारला कोणतेही गांभीर्य नाही असे लक्षात येते. 

ग्रामीण महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी पीडित महिलेपासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे यांना त्यांचे नाव दिले आहे. याचा अर्थ मुंडे यांना पाच अपत्य असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगापासून लपवली आहे. यामुळे त्यांनी त्वरित मंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

हे पण वाचा नवजात नातीसह सुनेचं जंगी स्वागत; साजऱ्या सासरची चर्चा तर होणारच! 

 यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारती जोशी, जिल्हा चिटणीस सुलभा मुजुमदार, महिला आघाडी सरचिटणीस आसावरी जुगदार, मंगल निपाणीकर, लता बर्गे, शोभा कोळी, सुनिता सूर्यवंशी, धनश्री तोडकर, राधिका कुलकर्णी, स्वाती कदम, गौरी जाधव, विद्या बनछोडे, विद्या पाटील, कविता लाड, चिनार गाताडे, सुषमा गर्दे, नूतन मुतगी, सुमन कांबळे, पद्मजा माळी, संगीता पंडे, संगीता माळी, यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
   

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde bjp women morcha kolhapur