'अन्यथा धनगराची पोरं हाती घेतील कुऱ्हाडी अन् बंदुका'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

अन्यथा धनगराची पोरं हातात कुऱ्हाडी, बंदुका घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा जिल्हाध्यक्ष शहाजी सिद यांनी दिला. 

हातकणंगले - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षात आमदार व खासदारांनी तोंडी पाठिंबा देण्यापेक्षा प्रत्यक्षांत वेळ देऊन समाजाला अनुसूचीत जमातीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन धनगर समाजाने आयोजित केलेल्या चक्काजाम अंदोलनात व्यक्त केले. तालुक्‍यातील धनगर बांधवांच्या वतीने येथील बसस्थानक चौकांत सांगली-कोल्हापूर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन दिले. 

पंचायत समिती कार्यालयासमोरून मोर्चाला सुरवात झाली. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा बसस्थानक परिसरात आला. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मारला. यावेळी दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक अशोक भवड यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाहतूक सुरळीत झाली. या वेळी शहाजी सिद, शंकर पुजारी, काशिनाथ शिनगारे, मंगेश हजारे, अमोल गावडे, सचिन पुजारी यांनी मनोगते व्यक्त केले. 
आंदोलनात अजय हराळे, अमोल हराळे, श्रीकांत पालखे, युवराज पुजारी, विक्की बन्ने, आणा सिद, आनंदा देशिंगे यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते. 

केवळ मतासाठी वापर 
भोळ्या धनगर समाजाचा मतांपुरता वापर राजकीय मंडळींनी केला आहे; परंतु धनगर समाज सुशिक्षित आहे. त्यामुळे हक्काचे आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही. संबंधितांनी आरक्षणामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा धनगराची पोरं हातात कुऱ्हाडी, बंदुका घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा जिल्हाध्यक्ष शहाजी सिद यांनी दिला. 

 
सांगली फाट्यावर महामार्ग रोको आंदोलन 
शिरोली पुलाची : धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, शासकीय भरती आरक्षणानंतरच करावी आदी मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सांगली फाटा येथे महामार्ग रोको आंदोलन केले. सकाळी अकरा वाजता आंदोलकांनी सांगली फाटा येथे कोल्हापूर सांगली राज्यमार्ग रोखून धरला. यळकोट-येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणांनी महामार्ग दुमदुमुन गेला. या वेळी शंकरराव पुजारी, शहाजी सिद यांची भाषणे झाली. मंगेश हजारे, निवास वाटेगावकर, काशिनाथ शिणगारे, युवराज पुजारी, हरी पुजारी यांच्यासह धनगर बांधव उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhangar community protest in kolhapur hatkanangale