मानव्यशास्त्राचा कुलगुरू होण्यास अडचणी

difficulties of vice chancellor of universities becoming subject in Anthropology in kolhapur
difficulties of vice chancellor of universities becoming subject in Anthropology in kolhapur

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या परंपरेत मानव्यशास्त्र शाखेतील उमेदवार सक्षम असूनही कुलगुरुपदापर्यंत पोचू शकत नाही. आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील शोधप्रबंध आणि पेटंट या अटींमुळे प्रादेशिक किंवा राष्ट्रीय भाषेचे अध्यापकही कुलगुरुपदापासून वंचित राहतात. याचा दूरगामी परिणाम उच्चशिक्षणावर होण्याची शक्‍यता आहे. यामुळे शिक्षणातील मूल्यांची जाणीव कमी होते, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

शिवाजी विद्यापीठाची कुलगुरू निवड नुकतीच झाली. यानिमित्ताने पुन्हा एकदा कुलगुरू निवड प्रक्रिया चर्चेत आली. प्रचलित निवड प्रक्रियेतील अटींमुळे मानव्यशास्त्रातील तज्ज्ञ कुलगुरू होऊ शकत नाहीत. सध्या राज्यातील बहुतांश कुलगुरू विज्ञान शाखेतील आहेत. शोध समितीतही अपवादानेच मानव्यशास्त्र शाखेतील व्यक्ती असतात. त्यामुळे या सदस्यांचा दृष्टिकोन विज्ञान शाखेच्या उमेदवाराला पूरक असतो.

समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे बहुतांश प्राध्यापक आपले शोधप्रबंध मराठीतून लिहितात. त्यामुळे ते परदेशी नियतकालिकांत प्रसिद्ध होत नाहीत; मात्र म्हणून ते दखलपात्र नसतात असे नाही. या प्राध्यापकांचे शोधप्रबंध स्थानिक किंवा प्रादेशिक बाबींशी निगडित असतात. ते कितीही महत्त्वाचे आणि संवेदनशील विषयांवरील असले तरी त्याची जाणीव परदेशी नियतकालिकांच्या संपादकांना असेलच असे नाही. त्यामुळे ते तेथे प्रसिद्ध होत नाहीत. याशिवाय मानव्यशास्त्रात पेटंटचा मुद्दा येत नाही.

प्रादेशिक किंवा राष्ट्रीय भाषा विषयांच्या प्राध्यापकांचे फार कमी शोधप्रबंध अन्य देशांत प्रसिद्ध होतात. या कारणांमुळे क्षमता, गुणवत्ता असूनही मानव्यशास्त्र शाखांमधील प्राध्यापकांना कुलगुरू होण्याची संधी दिली जात नाही. आत्तापर्यंत विद्यापीठातील प्रा. डॉ. डी. एन. धनागरे यांच्यानंतर मानव्यशास्त्र शाखेतील तज्ज्ञ व्यक्ती कुलगुरू झाली नाही.

"आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा कल विज्ञानाकडे असून, औद्योगिक व्यवस्थेला पूरक ठरेल असेच शिक्षण द्यावे, असा या व्यवस्थेचा आग्रह आहे. विद्यापीठांसारख्या संस्थांच्या प्रमुखपदी मानव्यशास्त्र विषयातील तज्ज्ञ, विद्वान असणे आवश्‍यक आहे. संशोधन, अभ्यास यामुळे त्यांचा संबंध समाजातील सर्व घटकांशी येतो. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतील लेखन हा गुणवत्तेचा निकष होऊ शकत नाही. स्थानिक प्रश्‍नांचा अभ्यास, त्यांच्या सोडवणुकीसाठी होणारे प्रयत्न, भाषा संवर्धनातील काम यालाही महत्त्व देणे आवश्‍यक आहे."

- प्रा. डॉ. उदय नारकर

"कुलगुरू निवड प्रक्रियेत बदल करण्याची आवश्‍यकता आहे. अर्ज करण्याच्या पद्धतीमुळे अनेक विद्वान लोक या प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. शोधप्रबंधांची संख्या हा गुणवत्तेचा निकष असू शकत नाही. त्या व्यक्तीने ज्ञानाचा उपयोग समाजासाठी, त्या विषयासाठी कशा प्रकारे केला हे पाहणे गरजेचे आहे. निवड प्रक्रियेतील अटींमुळे भाषातज्ज्ञ किंवा अभ्यासक या प्रक्रियेपासून लांब राहतात."

- प्रा. डॉ. राजन गवस, ज्येष्ठ साहित्यिक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com