
उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून उद्या पन्नास गाड्यांमधून दोनशे कार्यकर्ते रवाना होणार
कोल्हापूर : मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या (ता. १४) दसरा चौक येथून कोल्हापूर जिल्ह्यातून पन्नास गाड्यांमधून दोनशे कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कार्यकर्त्यांना पोलिसांनी मार्गात अडविण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
श्री. पाटील म्हणाले, "मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी विविध शासकीय कार्यालयांत नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले मराठा उमेदवार आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. समाज घटक म्हणून त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.
मराठा तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गाडी मोर्चा रद्द करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहोत. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मुंबईत पोचले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २०० कार्यकर्ते उद्या दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रवाना होत आहेत."
ते म्हणाले, "सारथी संस्थेला गतिमान करणे, आवश्यक आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला, मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित खटले मागे घेण्यासंदर्भात ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. मराठा समाजाची लढाई अद्याप संपलेली नाही. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही." पत्रकार परिषदेत सचिन तोडकर, प्रकाश सरनाईक उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे