व्हायरस कार्ड अडकवा अन कोरोना पळवा 

Disinfection Card Virus Blocker
Disinfection Card Virus Blocker

कोल्हापूर - कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोकांच्या हतबलतेचा कोण, कसा फायदा घेईल याचा काही अंदाज येत नाही. सध्या अशाच एका व्हायरस कार्डची बाजारात चलती सुरू आहे. कार्ड गळ्यात घातल्यानंतर विषाणू जवळ येऊ शकत नाही असा दावा केला जात असल्याने बहुतेक जणांच्या गळ्यात सध्या हे कार्ड नजरेस पडू लागले आहे. 

खासगी अथवा सरकारी आस्थापनात प्रत्येक कर्मचाऱ्याला ओळखपत्र घालणे गरजेचे असते. त्यावरून संबधित व्यक्ती नेमकी कुठे काम करते याची ओळख पटते. त्यामुळे गळ्यात हे कार्ड अडकविले जाते. मात्र कोरोनाचे संकट जसे वाढत निघाले आहे तसे एक नवे कार्ड गळ्यात दिसू लागले आहे. कार्ड नेमके काय आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे कार्ड गळ्यात घातल्याने कोरोना होत नाही असे उत्तर कानी पडू लागले आहे. बाजारात कार्डची विक्री सुरू असून त्याची किंमत पन्नास ते पंच्याहत्तर रूपये इतकी आहे. 

गर्दीची ठिकाणे टाळा, सोशल डिस्टंन्स राखा, मास्क वापरा, कोरोनाची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्या असे आवाहन एका बाजूला केले जात असताना व्हायरस कार्ड गळ्यात घातल्याने एक मीटरच्या आत विषाणू जवळ येत नाही असा दावा केला जात आहे. 

महामारीच्या संकटात कोरोनाची साठ टक्के उत्पादनांची सध्या चलती आहे. एफ्रिल मे मध्ये सॅनिटायजरला अधिक मागणी होती. मूळ औषधांची विक्री कमी होऊन हॅण्डवॉश, सॅनिटायरच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली. आता बहुतांशी कार्यालयात तसेच घरीही सॅनिटायजरच्या बाटल्या नजरेस पडत आहेत.

सॅनिटायजरची क्रेझ कायम असताना प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्यांच्या मागणीत तिप्पट ते चौपट वाढ झाली. आता व्हायरस कार्डची बाजारात चलती आहे. कोरोनाचे संकट काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. दिवसेदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहराचा आकडा दहा हजारांच्या दिशेने पुढे सरकत आहे. यात कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 

आपल्याला कोरोना होऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता असते. मात्र लोक अमुक एका रोगाला घाबरतात म्हंटले की नव्याने काहीतरी बाजारात आणायचे याचा ट्रेंन्ड सुरू झाला आहे. लोक अडचणीत असले की काहीही खपते याचा अंदाज आल्याने नव्या उत्पादनांची भर बाजारात पडत आहे. 


व्हायरस कार्ड गळ्यात घातल्याने जंतुसंसर्ग होत नाही याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती नाही. उत्पादनाचे नेमके कुठे संशोधन झाले. नेमकी कुणी मान्यता दिली याबाबत काहीही माहिती नाही. 

-प्रा. डॉ. विजय कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com