जिल्हाधिकाऱ्यांनी गाठला हरपवडे धनगरवाडा 

रणजित कालकर
Thursday, 1 October 2020

दुपारी तीनची वेळ. कुणाला कसलीही खबर नाही. सायरन वाजवत लाल दिव्यांच्या गाड्या पेरणोलीहून नावलकर वस्तीकडे सुसाट गेल्या. ताफा कुठे चाललाय याची अनेकांना उत्सुकता होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई व अधिकाऱ्यांचा ताफा उतरला व जंगलातून मार्ग काढत थेट हरपवडे धनगरवाड्यावर पोहचला.

आजरा  ः दुपारी तीनची वेळ. कुणाला कसलीही खबर नाही. सायरन वाजवत लाल दिव्यांच्या गाड्या पेरणोलीहून नावलकर वस्तीकडे सुसाट गेल्या. ताफा कुठे चाललाय याची अनेकांना उत्सुकता होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई व अधिकाऱ्यांचा ताफा उतरला व जंगलातून मार्ग काढत थेट हरपवडे धनगरवाड्यावर पोहचला. ग्रामस्थांशी संवाद साधत अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या व धनगरवाड्याच्या पुनर्वसनाची ग्वाही दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी तीन किलोमीटरची अवघड चढण चढत सुमारे सहा किलोमीटरची पायपीट केली. धनगरवाड्यावर गेल्यावर आत्मीयतेने ग्रामस्थांशी संवाद साधला. आरोग्य, शिक्षण, रस्ता, पाणी, वीज अशा पायाभूत सुविधांपासून वंचित वस्तीवर ही माणसं राहतात कशी याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. धनगरवाड्याचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तातडीने करण्याबाबतची सूचना प्रातांधिकारी डॉ. संपत खिलारी यांना केली.

नावलकरवाडी येथील शाळेत जिल्हाधिकारी देसाई यांनी पत्रकार बैठक घेतली. ते म्हणाले, ""नोकरीच्या कार्यकाळात इतक्‍या दुर्गम भागातील मानवी वस्तीला भेट देण्याची पहिली वेळ आहे. पंधरा धनगर कुटुंबे वनउपज, गाईचे दूध, थोडीफार शेती यातून गुजराण करीत आहेत. असे असतांनाही समस्यांचा सामना करीत कुटुंबे राहतात याचेच कौतुक आहे. त्यामुळे या कुटुंबाना पक्की घरे, गोठा व कसण्यासाठी अडीच एकर जमीन देण्याबाबतचा प्रशासनाचा प्रयत्न असून याबाबात प्रस्ताव करण्यात येणार आहे. पेरणोली येथील जमीन कुटुंबांना दिली जाईल. मुलांना चांगले शिक्षण, आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. रोजगार मिळावा हा हेतू आहेच त्याचबरोबर त्यांचा कायम जगाशी संपर्कही राहावा.'' 
प्रातांधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, कॉ. संपत देसाई, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, हरपवडे सरपंच वैशाली गुरव, गोविंद गुरव, महसूलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच... 
हरपवडे धनगरवाड्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली त्यामुळे या धनगरवाड्याचे नशीब उजळल्याची प्रतिक्रिया संपत देसाई यांनी दिली. कोल्हापूर कोल्हापूर

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector reached Harpwade Dhangarwada