कुत्रे आडवे आले आणि अधिकाऱ्याचा गेला जीव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

आडव्या आलेल्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्याकडील झाडाला मोटारसायकल धडकल्याने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे शाखाधिकारी रणजित लक्ष्मण कांबळे (वय 48) ठार झाले. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास लाकूडवाडी घाटात अपघात झाला. 

महागाव (जि. कोल्हापूर) : ते आज नेहमीप्रमाणे सकाळी आवरून बॅंकेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. वाटेत घाटात त्यांच्या दुचाकीच्या आडवे कुत्रे आले. त्याला चुकविण्याच्या नादात त्यांची दुचाकी झाडावर जावून आदळली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

आडव्या आलेल्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्याकडील झाडाला मोटारसायकल धडकल्याने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे शाखाधिकारी रणजित लक्ष्मण कांबळे (वय 48) ठार झाले. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास लाकूडवाडी घाटात अपघात झाला. 

पोलिसांनी सांगितले की, कांबळे यांचे मूळ गाव आजरा तालुक्‍यातील सुळे. ते काही वर्षांपासून कुटुंबासह गडहिंग्लजमधील डॉक्‍टर कॉलनीत राहतात. त्यांच्या पत्नी संगीता कांबळे येथील पालिकेच्या बॅ नाथ पै प्रशालेत शिक्षिका आहेत. कांबळे केडीसीसीच्या किणे शाखेचे अधिकारी होते. ते, सकाळी गडहिंग्लजहून मोटारसायकल (एमएच 09 - बीडब्ल्यू 4491) वरून किणे येथील बॅंकेला जात होते. लाकूडवाडी घाटात अचानक त्यांच्या मोटारसायकलसमोर कुत्रा आला. त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात ते थेट रस्त्याकडील झाडाला जाऊन धडकले. धडक जोरात होती. त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यातच ते ठार झाले. लॉकडाउनमुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. यामुळे याची माहिती तत्काळ मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, आई असा परिवार आहे. 

कोरोनासाठीच्या बॅरिकेड्‌सवर

ते, दुचाकीसह आदळले अन......

 

हे पण वाचा - रात्रीच्या कमाईवर उद्याचा दिवस, पण त्याआता करतात तरी काय?              

हे पण वाचा - कोल्हापुरात होणार एक हजार खाटांचे स्वतंत्र रुग्णालय                                      

हातकणंगले ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हातकणंगलेच्या सीमा सील केल्या आहेत. त्यासाठी लावलेल्या बॅरिकेड्‌सवर सोमवारी एक मोटारसायकल वेगाने येऊन धडकली. त्यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. भगवान रंगराव पाटोळे (वय 60, रा. गायरान वसाहत, घुणकी, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. हातकणंगले येथील भंडारे पेट्रोल पंपासमोर रात्री अपघात झाला. त्याची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की इचलकरंजीत कोरोना रुग्ण सापडल्याने हातकणंगले नगरपंचायतीने सीमा सील करण्याचा निर्णय घेतला. हातकणंगले - इचलकरंजी मार्गावर भंडारे पेट्रोल पंपाजवळ बॅरिकेड्‌स लावून रस्ता बंद केला; मात्र या ठिकाणी इंडिकेटर, रिफ्लेक्‍टर लावले नव्हते. 

घुणकी येथील भगवान पाटोळे नातेवाईकांना सोडण्यासाठी मोटारसायकल (एमएच 09 ईएस 6225) वरून इचलकरंजीला गेले होते. परत येताना त्यांना हातकणंगले येथील बॅरिकेड्‌सचा अंदाज आला नाही. भरधाव वेगाने ते त्यावर जाऊन आदळले. रस्त्यावर जोरात पडल्याने त्यांच्या मेंदूला जबर मार बसून मोठा रक्तस्राव झाला. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; पण अतिरक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या मागे वडील, तीन भाऊ, विवाहित मुलगी असा परिवार आहे. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog chucks in and officer lost his life