1945 ची स्थापना, फुटबॉलमध्ये दबदबा, मर्दानी खेळात सरस 

संदीप खांडेकर 
शुक्रवार, 10 जुलै 2020

बालगोपाल तालीम मंडळाच्या फुटबॉल क्‍लबची स्थापना 1945 ची. नावाजलेली तालीम अशी तिची ओळख आहे.

बालगोपाल तालीम मंडळाच्या फुटबॉल क्‍लबची स्थापना 1945 ची. नावाजलेली तालीम अशी तिची ओळख आहे. बाराईमाम संघातून बालगोपाल तालमीच्या परिसरातील खेळाडू खेळत होते. फुटबॉल व बालगोपालचे नाते जुने आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी केळवकर चषक जिंकून शहरात दबदबा निर्माण करणारी ही तालीम आहे. मर्दानी खेळाचा वारसाही तालमीने जपला. नामांकित मल्लही तालमीत घडले. 

वस्ताद शंकरराव चव्हाण बालगोपालचे प्रमुख. बाळकृष्ण मंडलिक, दिनकर मगदूम, शंकर साळोखे (टारझन), अण्णासाहेब तस्ते, गणपतराव निगवेकर, शंकरराव थोरात, बाळकृष्ण मंडलिक, विठ्ठल मंडलिक, डी. एस. विचारे, बाळ विचारे, श्री. नायडू, श्री. मेनन हे उत्कृष्ट फुटबॉलपटू. बाराईमाममध्ये सुरवातीला पाच ते सहा खेळाडू तालमीचे खेळत होते. तालमीचा फुटबॉल संघ असावा, अशी भूमिका तत्कालीन फुटबॉलपटूंनी घेत बालगोपाल तालमीचा फुटबॉल संघ स्थापन केला. फुटबॉल खेळण्याचा अनुभव असल्याने मैदानावर ते प्रतिस्पर्धी संघांना भारी पडत होते. बालगोपालने 1947 मध्ये केळवकर चषक जिंकून इतिहास घडवला. विश्वास शिंदे, गजानन मंडलिक, दत्ता नलवडे, अण्णा देसाई, हरिभाऊ यादव, शिवराम कांबळे, शंकरराव थोरात, शंकरराव साळोखे, शंकरराव मगदूम, दिनकर मगदूम, दिनकर यादव, बाळकृष्ण मंडलिक, बाळ सरनोबत, रामनाथ जठार, डी. एस. विचारे यांचा संघात समावेश होता. 

छत्रपती शहाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या जयभवानी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमधून दिनकर मगदूम खेळले होते. दोन वर्षानंतर ते पुन्हा बालगोपालमध्ये दाखल झाले. तालमीचे खेळाडू नारायण शिंदे, बाळ विचारे, लक्ष्मण पिसे, रघु पिसे, बबन थोरात, बाबूराव चव्हाण, पांडुरंग आगळे, निशिकांत मंडलिक, प्रभाकर मगदूम, दत्ता पोवार, केशव पोवार, निवास साळोखे, रंगराव मंडलिक, प्रकाश मंडलिक, उदय भोसले, सुनील पोवार, संभाजी देसाई, केरबा पाटील यांनी 1970 ते 1985 पर्यंतचा काळ गाजवला. 
वस्ताद शंकरराव चव्हाण फुटबॉलसह मर्दानी खेळात निष्णात होते. नारायण शिंदे लाठी, पट्टा, फरी गदका फेक करण्यात नावाजलेले होते. त्यांनी मर्दानी खेळाची जपणूक केली. मर्दानी खेळाचे धडे तालमीच्या परिसरातील मुलांना दिले. 

विशेष म्हणजे, तालमीने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची परंपरा आजही जपली आहे. सर्जा बुरुज पंजाची तालमीत प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवही धुमधडाक्‍यात व प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा केला जातो. बद्रीकेदार मंदिर, सचिन तेंडुलकर पुतळा गणेशोत्सवात उभारला होता. भगतसिंगांचा देखावा प्रभावी ठरला होता. त्र्यंबोली यात्रेकरिता सर्व नागरिक एकत्र येतात. सामाजिक उपक्रमांवरही तालमीचा भर आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, पूरग्रस्तांना जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट वाटप, फुटबॉलपटूंच्या कुटुंबाला आर्थिक मदत असे उपक्रम तालमीने राबवले आहेत. 

तालमीची कार्यकारिणी 
अध्यक्ष- निवास साळोखे, उपाध्यक्ष- प्रकाश मंडलिक, सचिव-राजू क्‌ुरणे, खजिनदार-रमेश घाटगे, सदस्य- निवास शिंदे, बाबूराव चव्हाण, संजय साळोखे, सुनील पिसे. 

(संपादन : प्रफुल्ल सुतार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dominance in football, glue in masculine sports