
इचलकरंजी : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड येथून दूधगंगा नळपाणी योजना राज्य शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे यापूर्वी मंजूर केलेली वारणा योजना आता पूर्णतः रद्द झाली आहे. दूधगंगा योजनेच्या पूर्व व्यवहार्यता अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दूधगंगा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश शासनाकडून दिले आहेत, अशी माहिती पालिकेचे पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी आज पत्रकारांना दिली.
इचलकरंजीला सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. पंचगंगा योजना प्रदुषणामुळे सातत्याने बंद राहते. कृष्णा योजनेच्या गळतीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे भविष्यातील शहराची लोकसंख्येचा विचार करून राज्य शासनाने अमृत योजनेतून वारणा योजना मंजूर केली होती. मात्र, या योजनेला वारणा काठावरील शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध झाला. अनेकवेळा बैठका होऊनही त्यावरून तोडगा निघाला नाही. त्यामुळे दुसरा दूधगंगा योजनेचा सुळकूड पर्याय पुढे आला.
यापूर्वी दूधगंगा योजना खर्चीक असल्याने वारणेचा पर्याय निवडला होता; पण दूधगंगा योजना खर्चीक कशी आहे, याची आपण पडताळणी केली. त्यामध्ये सादर केलेली चुकीची आकडेवारी दाखवली असून ही योजना खर्चीक नाही, असे श्री. चोपडे यांनी सांगितले. यापूर्वी वारणा योजना जिवंत ठेवून दूधगंगा योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, अमृत योजनेचा कालावधी संपला असून सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानमधून दूधगंगा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
यामुळे आता वारणा योजना पूर्णतः रद्द झाली असून दूधगंगा योजनेच्या पूर्व व्यवहार्यता अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नुकतीच मंजुरी दिली आहे. या अहवालात 98 कोटी 79 लाख रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. आता या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने ही योजना मार्गी लावण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यात येतील, असे श्री. चोपडे यांनी सांगितले. नगरसेवक उदयसिंह पाटील उपस्थित होते.
ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी चर्चा
सर्वांच्या सहकार्याने दूधगंगा योजना मार्गी लावली जाणार आहे. या योजनेला गैरसमजुतीतून होणारा विरोध दूर झाला आहे. ज्यांचा विरोध आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
- विठ्ठल चोपडे, सभापती, पाणी पुरवठा
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.