निपाणी शहर, उपनगरात कसून तपासणी : परराज्यातील लोंढे रोखण्यासाठी नाका बंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना च्या धास्तीने शहरात दररोज येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण राज्याबाहेरून येताना सीमेवर कुठेही त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही.

निपाणी - कोरोना च्या संसर्गामुळे नोकरी आणि व्यवसाय निमित्त राज्य आणि देशाबाहेर असलेले अनेक नागरिक आपापल्या शहराकडे परतू लागले आहेत. गेल्या चार दिवसापासून निपाणी आणि परिसरात नागरिकांचे लोंढे येत आहेत. परिणामी कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका आणि पोलिसांतर्फे योग्य ती खबरदारी घेऊन शहराच्या चारही बाजूला नाकाबंदी करण्यात आली आहे. शिवाय बाहेरून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना चौदा दिवस घराबाहेर न पडण्याचे आदेश येथील मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक यांनी दिले आहेत. शिवाय शहर आणि उपनगरात नव्याने आलेल्या नागरिकांची अंगणवाडी कार्यकर्त्या आणि पोलिसांतर्फे कसून तपासणी केली जात आहे.

कोरोना च्या धास्तीने शहरात दररोज येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण राज्याबाहेरून येताना सीमेवर कुठेही त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. काहीजण अनाठायी भीती बाळगून वैद्यकीय तपासणी न करता घरी बसूनच आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक एकत्र येऊन अशा नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी जाण्याचे आवाहन करीत आहेत. याशिवाय पोलीसातर्फेही अशा नागरिकांना घेऊन येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले जात आहे. यावेळी तपासणी झाल्यानंतर 14 दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 14 दिवसांनंतर पुन्हा एकदा परराज्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी झाल्यानंतर त्यांना इतरत्र करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे घरात सतत सॅनीटायझर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले तरीही काहीजण आपल्या मित्रांसमवेत गप्पागोष्टी करताना दिसत आहेत. त्यामुळे हा संसर्ग रोखणे कठीण झाले आहे. त्यासाठी सामाजिक संस्था आणि तरुण मंडळांनी पुढाकार घेऊन अशा नागरिकांना घराबाहेर पडू न देणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे. घरी राहण्याचे आदेश देऊनही गल्ली, बोळासह रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

स्वतःहून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी
अनेक जण परदेशात शहर इतर राज्यातून निपाणी आणि परिसरात आले आहेत पण मनात भीती असल्याने अनेक जण तपासणीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यांनी स्वतःहून आरोग्य तपासणी करून घेतल्यास स्वतः बरोबर कुटुंबालाही कोरोनापासून दूर ठेवता येणे शक्य आहे.
 

'परदेशासह इतर राज्यातून आलेल्या सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. तरीही खबरदारी म्हणून परराज्यातून आलेल्या नागरिकांनी 14 दिवस घराबाहेर न पडण्याची खबरदारी घ्यावी.'
- डॉ. सीमा गुंजाळ
वैद्याधिकारी गांधी, हॉस्पिटल निपाणी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the Corona infection citizens from outside the state and country are returning to their cities