सकल मराठा कोल्हापूरतर्फे रविवारी दसरा मराठा मेळावा

संदीप खांडेकर 
Friday, 23 October 2020

सकल मराठा शौर्य पीठाचे अध्यक्ष प्रसाद जाधव म्हणाले, "आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्वच समाजघटक एकत्र येत आहेत

कोल्हापूर : सकल मराठा कोल्हापूरतर्फे  मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी (ता. २५) दसरा मराठा मेळावा होत आहे, अशी माहिती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे सकाळी अकरा वाजता मेळाव्यास सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले, "मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक असून, त्यासाठी निर्णायक आंदोलनाची आवश्यकता आहे. त्यासाठीच दसरा मराठा मेळावा घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे. निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाजी मंदिरापर्यंत फेरी काढण्यात येणार आहे. त्यात अठरापगड जाती- धर्मातील लोक सहभागी होणार आहेत."

हे पण वाचा - आणि तुळजापूर येथील पिता-मुलांची झाली पंधरा वर्षांनी कोल्हापुरात भेट  

सकल मराठा शौर्य पीठाचे अध्यक्ष प्रसाद जाधव म्हणाले, "आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्वच समाजघटक एकत्र येत आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, व्यापारी यांची परिषदही होणार आहे." पत्रकार परिषदेस शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, राजू जाधव, लालासाहेब गायकवाड, सुरेश जरग, मोहन साळोखे, महादेव आयरेकर, प्रकाश सरनाईक उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dussehra Maratha Melava on Sunday on behalf of Sakal Maratha Kolhapur