
लॉकडाऊनमुळे या निवडणुकीला तीनवेळा स्थगिती देण्यात आली.
कोल्हापूर : कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उर्वरित ठराव संकलनाची प्रक्रिया सोमवारपासून (18) सुरू होत असून 25 जानेवारी हा ठराव दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी हा कार्यक्रम आज जाहीर केला.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी यापुर्वी 2 जानेवारी ते 31 जानेवारी 2020 या कालावधी संस्थेच्या पात्र सभासद संस्थांकडून ठराव मागवण्यात आले होते. पण सहकार आयुक्तांनी कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेला 27 जानेवारी रोजी स्थगिती दिली. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या निवडणुकीला तीनवेळा स्थगिती देण्यात आली.
हेही वाचा - इमारत बांधकाम होत असताना ही तरतूद करण्यात आली असल्याने या निधीवरुन वाद सुरु आहे
31 डिसेंबर रोजी ही स्थगितीची मुदत संपल्यानंतर 12 जानेवारी रोजी पुन्हा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित झाल्या तेथून पुढे त्या सुरू करण्याचे आदेश दिले होते. सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार वाडेकर यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठराव प्रक्रियेच्या तारखा जाहीर केल्या. यानुसार 18 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत ज्या संस्थांनी यापुर्वी ठराव सादर केलेले नाहीत, त्यांनी ते सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे ठराव दोन प्रतीत तालुका उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक किंवा विभागीय सहनिबंधक कार्यालयात सादर करावे लागणार आहेत.
संपादन - स्नेहल कदम