
कोल्हापूर : ना पक्ष, ना विचारसरणी, ना निष्ठा. जे खर्चाला ‘पॅकेज’ देतील, त्यांचा पक्ष व उमेदवारी इतकेच धोरण इच्छुकांचे आहे. त्यातून ज्यांच्याकडून बजेट मिळण्याची अपेक्षा आहे, प्रथम त्यांच्याकडे उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. तिथून हिरवा कंदील मिळाला नाही तरच इतरांचे दरवाजे ठोठवायला जायचे, असे त्यांनी ठरवल्याचे चित्र आहे.
महापालिकेची निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. इच्छुकांनी त्यादृष्टीने खूप पूर्वीपासून तयारी चालवलेली असते. काहींनी नेत्यांच्या संपर्काच्या, काहींनी कामाच्या जोरावर, तर बहुतांश जणांनी पैशांच्या जोरावर तयारी केलेली असते. त्यामुळे ‘माझी तयारी इतक्याची आहे, तुम्ही कितीची मदत करणार’ हा संवाद उमेदवारीवेळी नेते-कारभाऱ्यांबरोबर होत असतो. २००५ च्या निवडणुकीपासून नेत्यांकडून मोठे ‘अर्थ’बळ पोहचवण्याची पद्धत सुरू झाली. पुढील दोन निवडणुकांमध्ये आपल्या उमेदवाराला शेवटच्या टप्प्यात ‘बूस्ट’ देऊन निवडून आणण्याची किमयाही साधली. हे सारे पाहणाऱ्यांनी तेच डोक्यात ठेवले आहे.
सध्या सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, अशीच स्थिती आहे. आपले वजन वाढवण्यासाठी पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी उमेदवारांची चाचपणीही केली आहे; पण निवडणूक आता होईल की नाही हे सांगता येत नसल्याने प्रक्रियेला वेग आला नसला तरी बहुतांश इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीसाठी पक्षात नेतृत्व करणारा नेता खर्च करत असतो. काही पक्षांत एकमेव नेतृत्व असल्याने ते सारे निश्चित करतात. अशा काही पक्षांकडे आता ताकद असल्याने ते निवडणुकीत हात सैल सोडतील अशी इच्छुकांची धारणा आहे. त्यांच्याकडूनच मोठे पॅकेज दिले जाईल असा अंदाजही आहे. त्यासाठी ते कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांची ध्येयधोरणे काय आहेत या साऱ्याकडे दुर्लक्ष करण्याची तयारी आहे.
केवळ पॅकेज मिळवायचे हेच टार्गेट आहे. यामुळेच अशा पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात आगंतुक उगवलेलेही आहेत; पण प्रभागात मोठी ताकद असलेल्यांनाच पॅकेजचा लाभ मिळेल, अशीच शक्यता अधिक आहे. अनेक इच्छुकांनी मोठा खर्च सुरू केल्याने त्यांची प्रभागात चर्चा होती. त्यांनी या प्रकारेच खर्च अखेरपर्यंत करण्याच्या दृष्टीने बोलणी चालवली आहे. अशा ‘वजनदार’ उमेदवारांना कारभाऱ्यांकडून जोखले जात असून, कोणाला, कशी ‘मदत’ करायची हेही ठरवले जात असल्याचीही चर्चा आहे.
‘ते’ नेमके कशासाठी रिंगणात?
कामाच्या माध्यमातून प्रभागात कायम दिसणाऱ्यांचे काम सुरूच आहे; पण पत्रकांचा धडाका लावलेले निवडणुकीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्यानंतर गायब झाल्याने त्यांची खरी ओळख पटल्याची चर्चा प्रभागात आहे. ते नेमके निवडणुकीला कशासाठी उतरणार आहेत, याचा अंदाज नागरिकांनी लावण्यास सुरवात केली असल्याचेही चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.