जगात कोरोना अन् कोल्हापुरात पक्षांच्या जोरबैठका

election preparations in kolhapur for municipal corporation
election preparations in kolhapur for municipal corporation
Updated on

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीबाबत संभ्रमावस्था राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे दूर झाली, महापालिका निवडणुका वेळेतच होणार हे स्पष्ट झाल्याने राजकीय पक्ष आणि इच्छुकांनीही मोर्चेबांधणीला सुरवात केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप ताराराणी या प्रमुख पक्ष आणि आघाड्यांनी आता निवडणुकीसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना यांची महाआघाडी ही सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होते की,विरोधी भाजप-ताराराणी आघाडी सत्ता उलथून लावण्यात यशस्वी होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

पालकमंत्री सतेज पाटील ठरविणार रणनीती
महापालिकेच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. महापालिकेतील काँग्रेसचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील करतात, त्यांच्या नेतृत्वाखालीच या वेळची काँग्रेसची रणनीती ठरली जाईल. सध्या श्री. पाटील हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी आहे आणि ही निवडणूक त्यासाठी संधी आहे. 
पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी पालकमंत्री पाटील यांचा विधानसभेत पराभव झाला होता. राज्यातही काँग्रेसचे सरकार जाऊन भाजप-सेना युतीची सत्ता आली होती. विधानसभेतील पराभव विसरून श्री. पाटील ताकदीने महापालिकेच्या निवडणुकीत उतरले आणि पक्षाने तब्बल २५ जागा जिंकल्या. काँग्रेस हा महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. राष्ट्रवादीसोबत आघाडी करून काँग्रेसने महापालिकेची सत्ताही काबीज केली, अलीकडेच या सत्तेत शिवसेनेलाही सामावून घेतले. यावेळी राज्यात काँग्रेस सत्तेत आहे, श्री. पाटील हे मंत्री आहेत आणि त्यातही ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. 
त्यामुळे निश्‍चित याचा फायदा पक्षाला महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. राज्यात काँग्रेस सत्तेत असल्याने त्यातून महापालिकेशी संबंधित काही प्रश्‍न मार्गी लागतील, निवडणुकीपूर्वी ते लावण्याचा प्रयत्न श्री. पाटील यांचा असेल. थेट पाईपलाईन ही श्री. पाटील यांच्या प्रयत्नातूनच आकारास आली. निवडणुकीपूर्वी या योजनेचे रखडलेले काम पूर्ण करण्याची संधी त्यांना आहे. अशा अनेक जमेच्या बाजू असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत चांगली संधी आहे. तथापि या निवडणुकीत काँग्रेसकडेच इच्छुकांची भाऊगर्दी असणार, प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्‍य नसल्याने त्यातून होणारी बंडखोरी रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
काँग्रेसची भक्कम बाजू
  पक्ष राज्यात सत्तेत असल्याचा फायदा
  पालकमंत्री सतेज पाटील यांनी असल्याने कामे मार्गी लागतील.
  पक्ष सत्तेत असल्याने चांगली संधी
  रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहणार
महनगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न यापूर्वीच महापालिकेच्या सत्तेत आला आहे, मात्र हाच पॅटर्न आगामी महापालिकेत राहणार, की वेगळे समीकरण तयार होणार, यावरच सत्तेचे समीकरण अवलंबून राहणार आहे. या सर्वात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतरही गत महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. काँग्रेसने सर्वाधिक २७ तर राष्ट्रवादीने १५ जागा मिळवल्या. सत्ता स्थापनेत या आघाडीने शिवसेनेची साथ घेतली. 
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसही सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार आहे. सध्या शहरात काँग्रेसची परिस्थिती भक्‍कम आहे. महापालिकेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसकडे आहेत. तसेच शहराचे दोन्हीही आमदार काँग्रेसचे असून या सर्वात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे.  त्यामुळे आघाडी करताना काँग्रेसचा वरचष्मा राहिल्यास नवल वाटण्याचे कारण नाही, मात्र दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हेदेखील मुरब्बी राजकारणी आहेत. शहरावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. 

राष्ट्रवादीच्या भक्कम बाजू
  विद्यमान सभागृहातील मोठा मित्रपक्ष
  मंत्री मुश्रीफ यांच्या चाली भल्याभल्यांना मात देतात
  राज्यातील सत्तेत महत्त्‍वाच्‍या सहभागाचा फायदा
  राज्याचा पॅटर्न यापूर्वीच महापालिकेत

भाजपच्या झेंड्याखाली ताराराणी आघाडी रिंगणात
गतवेळच्या निवडणूक ताराराणी आघाडीसोबत युती केलेल्या भारतीय जनता पार्टीने महापालिकेत स्वत:च्या १३ जागा निवडून आणल्या होत्या. लोकसभा निवडणुकीनंतर धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ताराराणी आघाडीऐवजी भाजपच्या झेंड्याखालीच ती निवडणूक लढतील, अशी शक्‍यता आहे. महापालिका हे जिल्ह्याच्या राजकीय सत्ताकेंद्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. गतवेळच्या महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने १३ जागा जिंकल्या होत्या, तर ताराराणी आघाडीने १९ जागा घेतल्या. आगामी निवडणूक ते एकत्र लढणार आहेत. 
त्यामुळे महापालिकेच्या या निवडणुका राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली होत असल्या तरी त्याचा रंग सतेज पाटील, हसन मुश्रीफ  विरुद्ध महाडिक असाच राहणार आहे. सत्तेसाठीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी या प्रमुख चारही पक्षात चढाओढ लागणार आहे.पाच वर्षे राज्याच्या सत्ते असणारा भारतीय जनता पक्ष सध्या विरोधी पक्षात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी स्वबळावर प्रथमच १३ जागा निवडून आणल्या होत्या. ताराराणी आघाडीसोबत त्यांच्या आकडा ३२ पर्यंत पोहचला होता. आता विरोधी पक्ष असतानाही ही निवडूक ताकदीनेच लढण्याची त्यांची तयारी आहे.

भाजपच्या जमेच्या बाजू
  सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून झालेली कामे
  महाडिक बंधूंची एकत्रित ताकद अधिक भाजपला
  भाजपची मंडलस्तरीय रचना 
  पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांची मोट

एकदिलाचा धनुष्य उचलणार की पुन्हा गटबाजी
निवडणुकीचे  शिवधनुष्य पदाधिकारी एक दिलाने उचलणार की पुन्हा शिवसेनेतील गटबाजी उफाळून येणार याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वेसर्वा कोण असणार याची चाचपणी इच्छुक करीत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी बैठक घेउन रुपरेषा तयार करण्याचे काम सुरू आहे. यातून महापालिकेची निवडणूक एकाच कोणाच्या हाती न राहता प्रभागनिहाय जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे.
तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांनी गतवेळच्या निवडणूक आपल्या हाती ठेवली होती, मात्र आता ते माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्याच हाती राहणार, की खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह संजय पवार आणि विजय देवणे हे जिल्हाप्रमुख पुढाकार घेणार याची उत्सुकता आहे. तत्कालीन आमदार क्षीरसागर यांना काही प्रमाणात गटबाजीचा फटका बसला आहे. 

महापालिकेत सध्या शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेने मैत्री केल्यामुळे सत्तेतील परिवहन समिती सभापती आणि स्थायी समितीतील एक सदस्य शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. गतवेळी प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यावेळी मात्र राज्यातील सरकारच महाविकास आघाडीचे आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक प्रत्यक पक्ष स्वतंत्र लढणार, की एकत्रित लढायचे याबाबतचे मार्गदर्शन संपर्क प्रमुखांकडे मागितले असल्याचे समजते.  
सध्या जिल्ह्यात दोन खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे खासदार प्रा. मंडलिकसुद्धा या निवडणुकीत शिवसेनेच्या व्यूहरचनेत पुढे असण्याची शक्‍यता आहे. शहरावर वर्चस्व कोणाचे राहणार आहे, दोन्ही शहरप्रमुखांना यात प्रभाग वाटून त्यांची जबाबदारी दिली जाणार, की शिवसेनेतील गटबाजी येथे पुन्हा उफाळून येणार? हेसुद्धा महत्वाचे आहे. जिल्हाप्रमुखांकडे दक्षिण विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे त्यांच्याकडे काही प्रभाग जाणार काय, माजी आमदार म्हणून क्षीरसागर संपूर्ण निवडणुकीवर नियंत्रण ठेवणार का? असे अनेक प्रश्‍न गुलदस्त्यात आहेत. बैठका घेण्यापासून सुरू झालेली शिवसेनेची गटबाजी अशीच पुढे राहिली तर मात्र महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनच्या जमेच्या बाजू

  प्रभागनिहाय जबाबदारी मिळण्याची शक्‍यता
  नेहमीची गटबाजी पुन्हा उफाळणार का?
  खासदार प्रा. मंडलिक पुढाकार घेणार
  नेत्यांवर ठरणार कोणाच्या हाती निवडणूक
  खासदार विनायक राऊत यांची झाली कोल्हापुरात चर्चा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com