आजरा परिसरात हत्तीचा पुन्हा धुडगूस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

अकराच्या दरम्यान टस्कराने माजी उपसरपंच शिवाजी भोसले, भूपाल पाटील यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले.

उत्तूर (कोल्हापूर) : धामणे (ता. आजरा) येथे मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान टस्कराने माजी उपसरपंच शिवाजी भोसले, भूपाल पाटील यांच्या ऊस पिकाचे नुकसान केले. प्रकाश रावण यांच्या शेतातून हत्ती बामणे (ता. भुदरगड) मार्गे भुदरगडच्या दिशेने गेला.

आजरा परिसरातील हत्ती धामणे परिसरात आला. बाजीराव दुधाळे यांच्या शेतातून चिकोत्रा नदी पार करून तो भोसले यांच्या शेतात आला. याबाबत वन विभागाला माहिती मिळाल्यावर वनरक्षक नागेश खोराटे, रणजित पाटील, आनंदा कुंभार यांनी धामणे परिसराला भेट दिली. बुधवारी दुपारी तीनपर्यंत पथक परिसरात तळ ठोकून होते. हत्ती पुन्हा आलेल्या दिशेने निघून गेल्याचे खोराटे यांनी सांगितले. दरम्यान, चिकोत्रा नदीकाठावर असलेल्या गावात हती आल्याची माहिती दवंडीद्वारे दिली. 

हेही वाचा- कोल्हापुरात आता 23 मजली इमारत -

पिंपळगावातही नुकसान
पिंपळगाव: पिंपळगाव (ता. भुदरगड) शिवारात दाखल झालेल्या हत्तीने काल पिकाचे मोठे नुकसान केले. बाजीराव दुधाळे यांच्या उसाचे, अजित केसरकर यांच्या भाताच्या पोत्यांचे, धनाजी सुतार यांच्या भात पिकाचे, सागर मिसाळ यांच्या दुचाकीचे हत्तीने नुकसान केले. आज हत्ती धामणे (ता. आजरा) हद्दीतून, बामणे (ता. भुदरगड), पांगिरे हद्दीतून नागणवाडी जंगलात गेल्याचे वनपाल के. एच. पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. वनपाल पाटील, वनरक्षक किरण पाटील, वर्षा तोरसे, मोहन पाळेकर यांनी पिकाची पाहणी केली.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elephant caused great damage to the crop