अकरावी प्रवेश आजपासून सुरू

ओंकार धर्माधिकारी
Friday, 7 August 2020

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस उद्या (ता. 7)पासून सुरवात होत असून, प्रवेशाचा पहिला टप्पा 12 ऑगस्टपर्यंत असेल. दुसरा टप्पा 14 ते 23 ऑगस्ट, तर तिसऱ्या टप्प्यानंतर 29 ऑगस्टला दुपारी तीनला संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

कोल्हापूर  : अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस उद्या (ता. 7)पासून सुरवात होत असून, प्रवेशाचा पहिला टप्पा 12 ऑगस्टपर्यंत असेल. दुसरा टप्पा 14 ते 23 ऑगस्ट, तर तिसऱ्या टप्प्यानंतर 29 ऑगस्टला दुपारी तीनला संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

यापूर्वी केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवली जात होती. प्रवेश अर्जांची विक्री व स्वीकृती यांची ठिकाणे निश्‍चित असायची. तेथे विद्यार्थ्यांची गर्दी व्हायची. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्स राखणे आवश्‍यक असल्याने यंदा ऑनलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया होत आहे. प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती www.dydekop.org संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली. अर्जात मोबाईल क्रमांक योग्य पद्धतीने लिहिणे आवश्‍यक आहे. महाविद्यालयाची निवड करताना गेल्या वर्षीची कट ऑफ लिस्ट लक्षात घ्यावी. संकेतस्थळावर प्रत्येक महाविद्यालयाचे संयुक्त माहितीपत्रक पाहणे महत्त्वाचे आहे. 14 हजार 816 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. 35 कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी प्रवेश होतील. प्रवेशप्रक्रिया पूर्ण करताना शाळा सोडल्याचा किंवा नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नसल्यास विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तकातील हमीपत्र भरून अपलोड करावे, असे आवाहन सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी केले आहे. 

ऑनलाईन अर्ज भरताना काय हवे..? 
- दहावीच्या गुणपत्रकाची छायांकित प्रत 
- शाळा सोडल्याचा दाखला 
- विशेष आरक्षणाखाली प्रवेश घेणाऱ्यांनी आरक्षणासंबंधीचे पुरावे 
- प्रवेश शुल्क 80 रुपये 

वेळापत्रक असे : 
ऑनलाईन अर्ज पहिला भाग- 7 ते 12 ऑगस्ट 
दुसरा भाग- 14 ते 23 ऑगस्ट 
निवड यादी- 24 ते 28 ऑगस्ट 
यादी प्रसिद्ध- 29 ऑगस्ट 
प्रवेश निश्‍चिती- 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh admission starting today