उदयोन्मुख पैलवानाचा  दूधगंगा नदीत बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

तो एका कुस्ती केंद्रात सराव करीत होता. कोरोनामुळे केंद्र बंद ठेवले. तो गावी आला, आणि विपरित घडलं...

सिद्धनेर्ली ः एकोंडी (ता. कागल) येथील प्रेम साताप्पा फासके (वय 12) या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. 
याबाबत घटनास्थळ व कागल पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, दूधगंगा नदीमध्ये दुपारी बाराच्या सुमारास तो मित्रांसह पोहायला गेला होता. त्या वेळी त्याचा बुडून मृत्यू झाला. पोहताना त्याच्या मित्रांना तो दिसत नसल्यामुळे आसपासच्या नागरिकांना सांगितले.

आसपास शोध घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनाच त्याचा मृतदेह सापडला. श्री. फासके यांना प्रेमसह दोन मुले व दोन मुली अशी चार अपत्ये आहेत. मृत प्रेम सहावीमध्ये शिकत होता. कंदलगाव (ता. करवीर) येथील एका तालमीमध्ये तो कुस्तीचा सराव करीत होता. चालू वर्षी झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत त्याने तालुकापातळीवर पहिला तर जिल्हा पातळीवर तिसरा क्रमांक पटकाविला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मल्लांना गावाकडे पाठवले होते. त्याच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. कागल पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emerging wrestling drowns in Dudhganga River