त्या 45 जणींचा ऊर्जादायी वासोटा ट्रेक 

energetic Vasota trek of 45 people tourism marathi news
energetic Vasota trek of 45 people tourism marathi news

सांगली : आमच्या चाळिशीपार महिलांच्या ग्रुपतर्फे "योग-प्राणायाम वर्ग', सामूहिक चंद्र-सूर्य नमस्कार सुरू असतात. छोटे छोटे ट्रेकही सुरू असतात, मात्र नुकतेच आम्ही वासोटा किल्ला सर करण्याचा धाडसी संकल्प केला आणि पूर्णत्वासही नेला. या ट्रेकविषयी... 

स्मिता गोसावी 

अर्चना कुलकर्णी आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या आम्हा 45 जणींचा हा ग्रुप आहे. शनिवार-रविवारची सुटी बघून बच्चे कंपनीला बाबांच्या स्वाधीन करून आम्ही बामणोलीकडे प्रस्थान केले. रात्र शेकोटी गप्पांमध्ये धमाल केली. रविवारी सकाळी कोयना जलाशयातून वासोट्याकडे नेणाऱ्या बोटी तयार होत्याच. बोटीतून दोन तासांचा प्रवास मनाला प्रसन्न करून गेला. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर मनात थोडी धाकधूक होतीच. कॉलेजनंतर सुमारे तीस-चाळीस वर्षांच्या खंडानंतर आम्ही एवढा मोठा ट्रेक करीत होतो. मात्र अर्चनाच्या आश्वासक शब्दांनी आम्ही चढाईला सुरवात केली.

सुरवातीच्या पायऱ्या सहज चढून झाल्यानंतर सुरू झाली दगड-धोंडे, खाच खळग्यातून पायपीट. अर्चनाचे पती योगेश आणि त्यांचे स्नेही सोनावणे यांच्यामुळे आम्हाला हा प्रवास सोपा गेला. गर्द जंगलातील ही खडकाळ, उत्तुंग चढण आत्मविश्वासाने पार करत गडाच्या माथ्यावर पोहोचलो आणि मन भरून आले. स्वराज्यातील या दुर्गम किल्ल्यावर आम्ही 40 पेक्षा जास्त महिलांनी यशस्वी चढाई केली होती. अनवट वाटेवरून जाताना पुन्हा एकदा शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांप्रती कृतज्ञतेची भावना दाटली. आपसूकच जयजयकार झाला. गडावरील वातावरणात अनोखी ऊर्जा होती. चढणे शक्‍य होईल का, ही भावना मनातून पुसली गेली होती. 


आता गड उतरुन जाण्याची परीक्षा होती. घसरगुंडी होणारी कोरडी माती आणि दगड-धोंड्यांना पायाखालून निसटू न देण्याची कसरत करीत अडीच तासांची ही परीक्षा आम्ही कुठलीही पडझड, मोडतोड न होता पास झालो. पायथ्याशी पुन्हा महाराजांचा जयजयकार झाला. सुखासीन आयुष्यातून बाहेर पडत वेगळ्या वाटा तुडवण्याची मजा आम्ही अनुभवली होती. परतीचा शिवसागर तलावातील दोन तासांचा प्रवास सारा शिणवटा दूर करणारा होता.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com