कोल्हापुरात "ईएसआय'चे सेवा दवाखाने मंजूर ; कोल्हापूर जिल्हा देशात पहिला  

निवास चौगले
Wednesday, 14 October 2020

चेंबर ऑफ कॉमर्स व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन, कामगार युनियन यांनी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार चार औद्योगिक वसाहतींमध्ये सेवा दवाखाने मंजूर

कोल्हापूर - औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआय) सभासद असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत व त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी उपचार मिळावेत, म्हणून चेंबर ऑफ कॉमर्स व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन, कामगार युनियन यांनी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार चार औद्योगिक वसाहतींमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
 
खासदार मंडलिक म्हणाले, "वैद्यकीय सेवा आपल्या दारी ' या संकल्पनेनुसार कागल पंचतारांकीत, शिरोली, गोकूळ शिरगाव, हलकर्णी औद्योगिक वसाहतीत ईएसआयचे सेवा दवाखाने सुरु करावेत, अशी मागणी केंद्रीय श्रम मंत्रालयात वेळोवेळी केली होती, त्यानुसार या चारही औद्योगिक वसाहतीमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाले आहेत. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्‍टर्स व औषधे उपलब्ध होणार आहेत.' 

हे पण वाचादोन अट्टल घरफोड्यांना अटक ; 21 तोळे दागिन्यांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

 ताराबाई पार्क येथे केंद्र शासनाने बांधलेल्या रुग्णालयाचा लाभ सुमारे दीड-दोन लाख कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे नातेवाईक यांच्यासह सुमारे पाच लाख रुग्णांना होतो. त्यांना औषधोपचार व इतर बाबींकरीता कोल्हापूर येथे यावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असल्याने नविन सुरु होणाऱ्या सेवा दवाखान्यामुळे या रुग्णांना वैद्यकीय सुविधा त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात विनामोबदला मिळणार आहेत. खासदार मंडलिक यांनी संसदेत व संसदेच्या बाहेर यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांसाठी जास्त संख्येने सेवा दवाखाने सुरु करणारा कोल्हापूर जिल्हा हा देशातील पहिलाच जिल्हा बनला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ESIs service hospital approved in Kolhapur