धास्ती कोरोनाची : "एव्हरेस्ट'सह इतर मोहिमाही रद्द 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कस्तुरी सावेकर 31 मार्चला मोहिमेसाठी रवाना होईल, असे नियोजन होते. मात्र, मोहिमेबाबत अधिकृत मेल किंवा कुठलाही संदेश अजूनही तिला प्राप्त झालेला नाही. मात्र, एकूण परिस्थिती पहाता तिलाही आता पुढील वर्षीच ही मोहिम करावी लागणार आहे. 

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाची एव्हरेस्ट मोहिमेसह नेपाळमधून होणाऱ्या इतर मोहिमाही रद्द झाल्या आहेत. गेली काही दिवस या मोहिमा "स्टॅंडबाय मोड'वर होत्या. मात्र, आता आठ ते पंधरा दिवसांत मोहिमांना प्रारंभ होणार असतानाच मोहिमा रद्द होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे यांनी याबाबत आज दुजोरा दिला. 

दरम्यान, येथील कस्तुरी सावेकर 31 मार्चला मोहिमेसाठी रवाना होईल, असे नियोजन होते. मात्र, मोहिमेबाबत अधिकृत मेल किंवा कुठलाही संदेश अजूनही तिला प्राप्त झालेला नाही. मात्र, एकूण परिस्थिती पहाता तिलाही आता पुढील वर्षीच ही मोहिम करावी लागणार आहे. 

जगातील सर्वात उंच असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर 29 हजार फूटांहून अधिक उंचीचे आहे. एकूण सत्तर दिवसांची ही मोहिम असते. नेपाळच्या बाजूने जाणारे मोहिमवीर साधारणपणे मेमध्ये एव्हरेस्टच्या पायथ्याला पोचतात आणि चढाईला प्रारंभ करतात. जगभरातून प्रत्येक वर्षी पाचशे ते सहाशे मोहिमवीर या मोहिमेसाठी येत असतात. यंदा चीनने आपल्या बाजूने माऊंट एव्हरेस्टवर चढाईसाठी बंदी घातल्यानंतर नेपाळनेही आपल्या बाजूने चढाईसाठी बंदी घातली आहे. गेल्या वर्षी 885 गिर्यारोहकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. गिर्यारोहना दरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everest other campaigns canceled