esakal | बनावट नोटा खपविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कोल्हापूर जिल्ह्यात कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

0

बनावट नोटा कर्नाटकात खपविल्या असण्याची शक्‍यता असून त्याचा मास्टरमाईन्ड शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. 

बनावट नोटा खपविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कोल्हापूर जिल्ह्यात कारवाई

sakal_logo
By
अनिल केरीपाळे

कुरुंदवाड  (जि. कोल्हापूर)  : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे बनावट नोटा छापून त्या परिसरात खपविणाऱ्यांचे रॅकेट कुरुंदवाड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. बनावट नोटांची व्याप्ती व अन्य महत्त्वाचे धागेदोरे तपासण्यासाठी गोपनीयता बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले. 

खिद्रापूर येथील एका घरात बनावट नोटांची छपाई होत होती. त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी दोन पोती कागद, एक बॉक्‍स व अन्य साहित्य जप्त केले आहे. खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा न दिल्याने झालेल्या वादातून हा प्रकार उघडकीस आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती न देता चौकशी सुरू असल्याचे सांगितले. 

याबाबत मिळालेली माहिती अशी ः अकिवाट येथील एका तरुणाने टाकळी येथील एकाकडून दुप्पट बनावट नोटा देण्यासाठी काही रक्कम घेतली; मात्र बरेच दिवस बनावट नोटा त्याने दिल्या नाहीत. त्यातून बनावट नोटा छपाईचा उद्योग उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी अकिवाट येथील तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने सर्व साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिसांनी विलंब न करता शनिवारी (ता. 3) रात्री उशिरा खिद्रापूर येथील एकाला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून कागदाचे बंडल असलेली दोन पोती व बॉक्‍स आदी साहित्य ताब्यात घेतले. पोलिसांनी कारवाई सुरु केली असून अधिक तपासासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकात गेले आहे. 

दरम्यान, या कारवाईबाबत ठोस माहिती न मिळाल्याने खिद्रापूर, अकिवाट व सैनिक टाकळी येथे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बनावट नोटा कर्नाटकात खपविल्या असण्याची शक्‍यता असून त्याचा मास्टरमाईन्ड शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. 

संपादन : विजय वेदपाठक