राजू शेट्टींची ७२२७ देतेय साथ देण्याचा संदेश

Farmers Association leader raju shetti car story by sandeep khandekar
Farmers Association leader raju shetti car story by sandeep khandekar

 कोल्हापूर : राजू ऊर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी शेतकरी संघटनेचे हाडाचे नेते. शिरोळ तालुक्‍यातल्या अर्जुनवाड रोडवर त्यांचं निवासस्थान. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण बागणी हायस्कूलमधलं. शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता. ते शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या मुशीत घडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची त्यांनी स्थापना केली. ‘साथ दो-दो साथ’ हे त्यांचं ब्रीद. या उच्चारावरून गाडीच्या नंबरप्लेटवर ७२२७ क्रमांक झळकला. आज या नंबरचे स्वतंत्र अस्तित्व तयार झालेय. केवळ शिरोळ नव्हे, तर जिल्ह्यात हा नंबर परिचयाचा झाला आहे.
 

राजू शेट्टी राजर्षी शाहू वाचन मंदिराचे कार्यकारी मंडळाचे सदस्य. शेतकरी संघटनेत त्यांचा १९९२ मध्ये प्रवेश झाला. शिरोळ तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. ऊस झोन बंदीविरोधी त्यांचे १९९६ चे आंदोलन चर्चेत आले. पुढे आंदोलनावेळी पोलिसांचा लाठीमार त्यांना खावा लागला. त्यांचा डावा पाय फ्रॅक्‍चर झाला. त्यांनी २००२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. वर्षभराने शेतकऱ्यांनी वर्गणी काढून त्यांना क्वालिस गाडी भेट दिली. तिचा क्रमांक एमएच ०९ ४४८७ होता. १७ वर्षांत १२ लाख किलोमीटरचा प्रवास गाडीने केला. स्वाभिमानी संघटनेची राज्यभर बांधणी करण्यासाठी गाडीचा उपयोग झाला. 
शेट्टी यांनी २००४ च्या विधानसभेत नशीब आजमावले. शिरोळ मतदारसंघातून ते विजयी झाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते २००९ च्या निवडणूक रिंगणात उतरले.

मतदारांनी त्यांना साथ देत विजयाचे पारडे त्यांच्या बाजूने फिरवले. दोन वर्षांनंतर त्यांच्या दारात फॉर्च्युनर गाडीचे आगमन झाले. गाडीच्या नंबरवरून शेतकऱ्यांना साथ देण्याचा अनोखा संदेश दिला. गाडीवर ७२२७ क्रमांक चिकटला. अवघ्या चार वर्षांत गाडीने चार लाख ७० हजार किलोमीटरचा प्रवास केला. पुन्हा २०१६ मध्ये इनोव्हा क्रिस्टा गाडीची खरेदी झाली. गाडीच्या नंबरमध्ये तडजोड केली नाही. गाडीने राज्यासह देशात आजअखेर दोन लाख १० हजार किलोमीटरचा प्रवास केलाय. 


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांची आंदोलने सुरू आहेत. शेट्टी आणि शेतकरी हे समीकरण पक्कं झालंय. दूध, ऊस दरवाढीसह विविध विषयांवरच्या आंदोलनात शेट्टींचा सक्रिय सहभाग असतो. पत्नी संगीता, मुलगा सौरभ त्यांच्याबरोबरीने काम करीत आहेत. निवडणूक प्रचारात त्यांचा सहभाग असतोच. तसा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जाणून घेण्यात ते कमी नाहीत. शेट्टी व कार्यकर्त्यांचे नाते दृढ बनले आहे. शेट्टींना साथ देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com