माझ्या शेतातून ऊस न्यायचा नाही म्हणत रोखली 40 एकर ऊसाची तोड 

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 21 February 2021

उचगांव (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने नेहमीच्या वहिवाटीचा रस्ता अडवून केल्यामुळे परिसरातील सुमारे 25 ते 30 शेतकऱ्यांची चाळीस एकर उसाची तोड थांबली आहे.

गांधीनगर : उचगांव (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने नेहमीच्या वहिवाटीचा रस्ता अडवून केल्यामुळे परिसरातील सुमारे 25 ते 30 शेतकऱ्यांची चाळीस एकर उसाची तोड थांबली आहे. अनेकांनी विनंती करूनही या शेतकऱ्याच्या असहकार्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे तक्रार केल्यानंतर येत्या सोमवारी उचगांव मंडलाधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत.

गाव शिवारातील प्रलंबित आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सामोपचाराने आणि लोकसहभागाने वाट मोकळी करून देण्यासाठी जिल्ह्यात महसूल जत्रेचे आयोजन करून पानंद रस्ते अतिक्रमणमुक्त होण्यास सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे असा प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. जुन्या विजापूर रस्त्यावर उचगांव रेल्वे गेट क्रमांक 25 होत आहे.  गेट अपुरे असल्याने दक्षिणेकडील शेतकऱ्यांना ये-जा करणे व उसाची वाहतूक करण्याची अडचण निर्माण झाली होती. येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन रेल्वे खात्याबरोबर खासदारांना निवेदन देऊन येथील गट ऐवजी रेल्वे रुळाखाली अंडरब्रिज करण्याची मागणी केली होती. कालांतराने रेल्वे खात्याने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन येथील अंडर ब्रिजचे काम सुरू केले. ते पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले आहे.

रेल्वे खात्याने शेतकऱ्यांना सहकार्य केल्याने आज या पुलाखालून ऊस वाहतूक करणे सोपे झाले आहे. दरम्यान  दक्षिणेकडील वहिवाटीच्या रस्त्यावरुन उसाची वाहतूक होते ही वहिवाट काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातूनच सोडल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच सोय झाली होती. मात्र यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या कारणास्तव येथील वाहतूक रोखली आहे. सुमारे 25 ते 30 शेतकऱ्यांच्या ऊस तोडी थांबल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी या बाबत तहसीलदार यांना तक्रार दिली आहे. तहसीलदारांनी येथील मंडल अधिकाऱ्यांना याबाबतचा चौकशी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारी येथील पाहणी झाल्यानंतर त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

एका शेतकऱ्याने नेहमीच्या वहिवाटीचा रस्ता अडवून केल्यामुळे परिसरातील सुमारे 25 ते 30 शेतकऱ्यांची चाळीस एकर उसाची तोड थांबली या शेतकऱ्याच्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तहसिलदारांनी या बाबत लक्ष घालून हा प्रश्न सोडवून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - कावजी कदम, माजी सरपंच उचगांव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers issue in Gandhi Nagar in Kolhapur district