
कोवाड येथील ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने आज संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "बंधारा बचाव'चा नारा देत बंधाऱ्याच्या कमानींचे प्रतिकात्मक पुजन करून रोष व्यक्त केला.
कोवाड : येथील ताम्रपर्णी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने आज संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "बंधारा बचाव'चा नारा देत बंधाऱ्याच्या कमानींचे प्रतिकात्मक पुजन करून रोष व्यक्त केला. दुरुस्तीचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर, 21 डिसेंबर रोजी शेकडो शेतकऱ्यांच्यासह नदीपात्रात जलआंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
बंधाऱ्याच्या कमानींना मोठी भगदाडं पडली आहेत. काही कमानी जमिनीपासून ढासळल्या आहेत. पाण्याची गळती वाढलेली आहे, असे असतानाही पाटबंधारे विभागाने आठ दिवसापूर्वी बरगे घालून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांच्या अध्यक्षस्थेखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. कागणीचे माजी उपसरपंच जनार्दन देसाई यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या कमानींचे हाल घालून प्रतिकात्मक पुजन केले.
या वेळी शेतकऱ्यांनी "बंधारा बचाव'चा नारा दिला. बैठकीत शेतकऱ्यांनी बंधाऱ्याच्या पडझडीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला. बंधाऱ्याची एवढी मोठी पडझड होत असताना बरगे का घातले? असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
बंधाऱ्याची पडझड झाल्यामुळे तात्काळ त्याची दुरुस्ती करुन पाणी अडविले पाहिजे होते. पण अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याने बंधाऱ्याची ही अवस्था झाल्याचे देसाई यांनी सांगितले. या वेळी कागणीचे माजी उपसरपंच जनार्दन देसाई, गजानन राजगोळकर, अर्जून वांद्रे, संजय कुट्रे,विक्रम पाटील, अल्पी लोबो,गजानन पाटील (नागरदळे) यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
"सकाळ'च्या वृत्ताने उभारली चळवळ
नोव्हेंबर महिन्यात नदीतील पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यावेळी बंधाऱ्याची दुरुस्ती करणे शक्य होते. याबाबत दै. सकाळ"ने बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत बातमी प्रसिध्द करुन शासनाचे लक्ष वेधले होते. पण पाटबंधारे विभागाने आहे त्या स्थितीत तात्काळ बरगे घालून त्यावर पडदा टाकण्याचा प्रकार केल्याने पुन्हा "सकाळ'ने दुरुस्ती करण्यापूर्वीच बरगे"या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केल्यानंतर शेतकऱ्यांनी बंधारा बचाव मोहीम हाती घेतली आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur