थरारक; मुंगूस सापाची शिकार करतो पण अजगराने मुंगसाबरोबर

अशोक तोरस्कर  
Monday, 23 November 2020

सध्या शेतातील गवत कापणीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिकारीच्या शोधात असणाऱ्या मुंगसाने अचानक अजगरावरच हल्ला केला

उत्तूर - मुंगूस सापाची शिकार करतो, मात्र अजगरानेही मुंगसाबरोबर झुंज देत त्याच्या भोवती विळखा घातला. या लढाईमध्ये अजगराची सरशी झाली. अजगराने मुंगसाला गिळून टाकले आणि शिकार करणाराऱ्याची शिकार झाली. बहिरेवाडी (ता. आजरा) येथील उत्तम पोरे यांच्या जखनी नावाच्या शेतात ही घटना घडली. 

सध्या शेतातील गवत कापणीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिकारीच्या शोधात असणाऱ्या मुंगसाने अचानक अजगरावरच हल्ला केला. अजगरानेही मुंगसाला चांगलेच उत्तर देत त्याच्या भोवती विळखा घातला. मुंगसाने चपळाईने त्यामधून स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला मात्र अजगराच्या तावडीतून ते सुटले नाही.

हे पण वाचा - शहीद जवान संग्राम पाटील यांचे स्वप्न अधुरे....

शेवटी अजगराने मुंगसाला गिळून टाकले. यानंतर अजगर दोन दिवस या ठिकाणी पडून राहिले. शेतकऱ्यांना या ठिकाणचे गवत कापायचे होते. यामुळे त्यांनी बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील सुधाकर सुतार यांचेसी संपर्क साधला. बाळासाहेब धुमाळ, प्रकाश मोदर, संदीप जाधव, बाळासाहेब सावंत सर्व (रा.बेकनाळ) व अवधुत पोरे ,सुहास चौगूले (रा.बहिरेवाडी) यांनी शेतात जावून आठ फुट लांबीच्या अजगरला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. सुधाकर सुतार यानी यापुर्वी कात्रज( पुणे) येथे सर्प विद्यालयात काम केले आहे.त्यानी अनेक सापाना व सरपटणा-या प्राण्याना जिवदान दिले आहे. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight between Dragon and Mongoose