सावकारीतून मित्रालाच दिली ठार मारण्याची धमकी ; मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

व्याजासह दहा लाख रुपये व दोन फायनान्स कंपन्यांच्या खात्यावर दहा लाख रुपये भरावयास लावूनही आणखी चार लाखांची मागणी

कोल्हापूर - खासगी सावकारीतून व्याजाने घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात प्रवीण बाळकृष्ण पाटील (वय ४८, रा. संकल्प बी- शेवंतीपार्क, बळवंतनगरजवळ पाचगाव, ता. करवीर) यांच्याकडून व्याजासह दहा लाख रुपये व दोन फायनान्स कंपन्यांच्या खात्यावर दहा लाख रुपये भरावयास लावूनही आणखी चार लाखांची मागणी केल्या प्रकरणी, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या विरोधात राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मिरजकर तिकटी येथे प्रवीण बाळकृष्ण पाटील हे शेअर ब्रोकरचा व्यवसाय करतात. ते पत्नी, मुलगा व मुलीसह पाचगाव येथे राहतात. मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जयसिंग जाधव (रा. राम गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्याशी त्यांची मैत्री आहे. त्यांनी शेअर मार्केटच्या व्यवसायासाठी राजू जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या मोबदल्यात प्रवीण पाटील यांनी राजू जाधव यांच्याकडून घेतलेल्या कर्जापोटी ३ लाख ४ हजार २०० रुपये महिंद्रा फायनान्स कंपनीत भरले. तसेच जाधव याला १० लाख रुपये व्याज दिले. तसेच १५ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत राजू जाधव यांच्या एका खासगी बॅंकेच्या खात्यावर ७ लाख १० हजार रुपये व्याजासह भरले होते. तरीदेखील जाधव यांनी त्याच्याकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशाच्या बदल्यात आणखी ४ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम देण्यास प्रवीण पाटील यांनी नकार दिल्याने जाधव यांनी त्यांच्या मोटारीच्या हप्त्याची रक्कम भरण्यास सांगितले. याला देखील पाटील यांनी नकार दिल्याने जाधव यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पाटील यांना फोन केला. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी दिली. अखेर खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून प्रवीण पाटील यांनी कुटुंबासह राजवाडा पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हे पण वाचा -  मोठी बातमी ; अंत्यसंस्काराहून परतत असताना त्याला कोरोना असल्याचे समजले अन्...

 

हे पण वाचा -  ह्रदयद्रावक ; जन्म घेताच  गाठले कोरोनाने; मातेलाही झाली लागण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: files case against kolhapur MNS leader