
कोल्हापूर ही कलानगरी. साहजिकच चित्रकार, शिल्पकारांची मोठी परंपरा शहराला लाभली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर ही कलानगरी. साहजिकच चित्रकार, शिल्पकारांची मोठी परंपरा शहराला लाभली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील चित्रकारांनी केलेल्या भव्य पोस्टरची मोठी चर्चा व्हायची. निवडणुकीसाठी आचारसंहिता आली आणि अशी पोस्टर बंद झाली; पण ७२ वर्षांपूर्वीच तत्कालीन पालिकेने चित्रकारांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे. शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात कलातपस्वी आबालाल रहेमान यांचा पुतळा उभारला गेला आणि एका चित्रकाराचा देशातील पहिला पुतळा उभारण्याचा मानही कोल्हापूरनेच मिळविला.
कोल्हापूर आर्ट सर्कल संस्थेच्या माध्यमातून कलातपस्वी आबालाल रहेमान यांचा पुतळा उभारणीचा विचार पुढे आला आणि त्यासाठी स्मारक समिती स्थापन झाली. कलाकारांबरोबरच जनतेच्या आश्रयावर रहेमान यांचा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार बाळ चव्हाण यांनी साकारला आणि तो फत्तेलाल शेख यांच्या हस्ते पद्माराजे उद्यानात २८ डिसेंबर १९४८ ला बसविण्यात आला. एखाद्या चित्रकाराचा देशातील हा पहिलाच पुतळा. मात्र, त्यानंतरच्या काळात सुशोभीकरणावेळी उद्यानाच्या मध्यभागी असणारा हा पुतळा महापालिकेने काढून ठेवला.
कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड संस्थेच्या माध्यमातून पुन्हा हा पुतळा बसवण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला. ज्येष्ठ चित्रकार जयसिंगराव दळवी, सज्जनराव माने, पी. एच. हळदीकर, सरिता माने, भालचंद्र कारेकर, विश्रांत पोवार, शांताराम कागले आदींचा त्यात पुढाकार होता. आबालाल रहेमान यांच्याबरोबरच या ठिकाणी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचाही पुतळा उभारावा, असा विचार पुढे आला आणि आर्टिस्ट गिल्डने बाबूराव पेंटर यांचा पुतळा तयार करून महापालिकेला सप्रेम भेट दिला.
२७ ऑगस्ट १९८८ ला या दोन्ही पुतळ्यांचे पद्माराजे उद्यानात अनावरण झाले. मात्र, कलातपस्वी आणि कलामहर्षींच्या जयंती व स्मृतिदिनाच्या निमित्तानेच या पुतळ्यांची महापालिकेला आठवण होते, हे वास्तव असले तरी या स्मारकांची दुरवस्था लक्षात येताच महापालिकेचे लक्ष वेधले जाते आणि या स्मारकांच्या संवर्धनावर भर दिला जातो.
हेही वाचा- बबन शिंदे यांचा अंधश्रद्धेवर प्रहार; अख्खं कुटुंबच रंगते भजना
जमखानावाला यांना निमंत्रण...
दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी तत्कालीन नगरविकासमंत्री इसाक जमखानावाला, तत्कालीन सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आवाडे यांना निमंत्रित केले होते. तत्कालीन महापौर दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. त्या वेळी रामकृष्ण सोनवणे उपमहापौर, जयराम पचिंद्रे स्थायी समिती सभापती, बंडोपंत जितकर उद्यान समितीचे सभापती, तर सुरेश साळवी आयुक्त होते.
संपादन- अर्चना बनगे