वाट अडवून चालकाला केली मारहण अन् चोरला ट्रॅक्‍टर

ओंकार धर्माधिकारी
Wednesday, 28 October 2020

टॅक्‍टर चोरणाऱ्या पाच जणांना अटक 
ट्रॅक्‍टर, ट्रॉलीसह पाच लाख रुपये जप्त.

कोल्हापूर : वाट अडवून चालकाला मारहणा करून त्याचा ट्रॅक्‍टर, ट्रॉली चोरल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली. हे पाचही जण सराईत चोरटे असून त्यांच्यावर चोरी, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या ट्रॅक्‍टरसह पाच लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

विजय रामचंद्र गौड (वय 36, रा.निकम गल्ली कळंबा), रोहित राजेंद्र नलगे (वय 27, रा.महात्मा फुले गल्ली, कळंबा), विजय महादेव पाटील (वय 40, रा. 727, विजय नगर, वाशी), राजाराम रावसाहेब माने (वय 29, रा. माने-कोळी वस्ती, ता.जत, जि.सांगली), शंतनुकुमार दत्तात्रय खंदारे (वय 48, रा. बुधवारपेठ, माधव टॉकीज जवळ, मिरज, जि.सांगली) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत. या गुन्ह्याबद्दल माहिती देताना सावंत म्हणाले, "उत्तरेश्‍वर रामभाऊ माने (रा.दिंद्रुड, ता.माजलगाव, जि.बीड) 16 मार्च ला बिद्री कारखान्याला ऊस घालून मुरगूड गावातून निघाले होते. यावेळी निढोरी पुलाजवळ चार चाकीतून आलेल्या पाच अज्ञात इसमांनी त्यांना अडवले.

हेही वाचा- परिवहन समिती सभापतीपदी चंद्रकांत सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड -

शिविगाळ करत मारहाण केली व त्यांचा मोबाईल आणि ट्रॅक्‍टर, दोन ट्रॉली घेऊन पसार झाले. या जबरी चोरीचा गुन्हा मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. मात्र चोरटे सापडत नव्हते. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे होता. या गुन्ह्यातील माने आणि खंदारे ट्रॅक्‍टर व ट्रॉली घेऊन साखर कारखान्यात नोंदणीसाठी उदगाव शिरोळ बायपास मार्गाने जाणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यांनी सापळा रचून माने आणि खंदारे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ट्रॅक्‍टर, एक ट्रॉली व पाच लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे तपास केल्यावर त्यातून गौड आणि नलगे यांची नावे निष्पन्न झाली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाचही जणांवर मारहाण, जबरी चोरी याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  

    संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five arrested for stealing tractors Five lakh rupees including tractor and trolley seized