
निळी फुले, हिरवीगार पाने अन् पांढऱ्या बियांचा फुलोरा असलेले हे झुडूप शोभेचे नाही, ते झुडूप आहे, परदेशी तणाचे. युपॅटोरियम ओडोरॅटम् (रानमोडी/जंगलमोडी) असे शास्त्रीय नाव असलेल्या या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरविला आहे.
कोल्हापूर : निळी फुले, हिरवीगार पाने अन् पांढऱ्या बियांचा फुलोरा असलेले हे झुडूप शोभेचे नाही, ते झुडूप आहे, परदेशी तणाचे. युपॅटोरियम ओडोरॅटम् (रानमोडी/जंगलमोडी) असे शास्त्रीय नाव असलेल्या या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरविला आहे.
काही वर्षांपूर्वी परदेशातून आलेल्या या तणाने घट्ट मुळे रोवलायला सुरवात केली आहे. केवळ पश्चिम घाटच नव्हे; तर कोल्हापुरातील बागा, उपनगरांतील मोकळ्या जागांवर ते गतीने वाढत आहे. हे तण वेळीच निर्मुलन झाले नाही; तर शेतीला अन् जंगलाला पर्यायाने जैवविविधतेला धोका आहे.
दक्षिण अमेरिका, मेक्सिको, कॅरिबियन बेटे, आशिया, पश्चिम अफ्रिका, ऑस्ट्रेलियात ते आढळते. ते नेमके पश्चिम घाटात कसे आले, हे समजणे अशक्य आहे. बिये, रोपे किंवा अन्य माध्यमातून ते आले असावे; पण ते फोफावले आहे. अखंड पश्चिम घाटातील जंगलात, गवताळ भागात ते घुसले आहे. सुर्य फुलाच्या कुळातील युपॅटोरियम ओडोरॅटम्च्या अनेक प्रजाती आहेत. यातील ओडोरॅटम् प्रजाती भागात आहे. या तणाला असंख्य बिया येतात. बिया पक्व झाल्या की, फुलोऱ्याच्या साह्याने वाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होण्यास सुरवात होते. जनावरे, पक्षी या तणाला हात लावत नाहीत. खातही नाहीत. विशेषत: पावसाळा अन् हिवाळ्यात ते अधिक गतीने वाढत जाते. तणाच्या झुडूपावर 90 ते 80 हजार बिया तयार होतात.
धोकादायक आढळ
पश्चिम घाटातील कोकण विभाग, भुदरगड परिसर, आजरा, चंदगड, पुणे-बंगळूर रस्त्याशेजारी, हातकणंगले पसिरतर, कोल्हापूर शहरातील बागांत, उपनगरातील मोकळ्या जागांत, माती-कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळ आहे. अगदी शेतातील बांधावर, कुरणांत हे तण पसरत चालले आहे.
""काही वर्षांपूर्वी वन विभागाला या विदेशी तणांवर नियंत्रण करण्यासाठी पावले उचलावीत असे सांगितले होते; मात्र वन विभागाने दुर्लक्ष केले. वन विभाग कारवी काढण्यासाठी प्रयत्न करते; मात्र हे तण काढण्यासाठी प्रयत्न करत नाही. असेच दुर्लक्ष होत गेले तर ते अखंड पश्चिम घाटाच्या जंगलात अधिक गतीने पसरत जाईल.
-प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पतीशास्त्रज्ञ