भिकशेठ पाटील; लढवय्या कार्यकर्ता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

एखादी गोष्ट करायची म्हटलं की असेल त्या वाहनाने तत्काळ बाहेर पडणे आणि कामाला लागणे, ही त्यांची खासियत

कोल्हापूर: कोल्हापूरच्या सामाजिक-राजकीय क्षेत्राबरोबरच लोकराजा शाहू मालिकेसाठी भिकशेठ पाटील यांनी केलेले काम नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे आहे. कारण ही मालिका लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि राजर्षी शाहूंचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे किंबहुना नव्या पिढीला ते कळावे, हा त्यांचा आग्रह कायम होता. शूटिंगवेळी तर अगदी साधी खुर्ची लागली तरी स्वतः पळापळ करून ते मिळवून द्यायचे. बालकल्याण संकुल, हिंदू-मुस्लिम ऐक्‍य मंडळ, शाहू प्रतिष्ठान, शिवाजी तरुण मंडळ, तालीम संघ अशा विविध संस्थांशी त्यांचा अखेरपर्यंत स्नेह कायम होता. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द जितकी महत्त्वाची त्याहीपेक्षा शहरातील विविध सामाजिक संस्थांशी त्यांची जुळलेली नाळ आणि विविध सामाजिक चळवळीतील त्यांचा सक्रिय सहभाग साऱ्यांनाच सळसळती ऊर्जा देऊन जायचा. 

‘इंद्रधनुष्य’ प्रेसमध्ये मॅनेजर असणाऱ्या भिकशेठ यांच्या पुढच्या साऱ्या प्रवासाचे आम्ही साक्षीदार. महापौर असताना त्यांनीच बालकल्याण संस्थेला वर्षाला महापालिकेतर्फे एक लाख रुपये अनुदान देण्याची परंपरा निर्माण केली आणि तेथून पुढे महापालिकेतर्फे प्रत्येक वर्षी हा निधी संस्थेला मिळू लागला. संस्थेचे मानद सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. केवळ यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवार यांच्यापर्यंतच नव्हे तर शहराच्या गल्ली-गल्लीत दांडगा जनसंपर्क असणारा हा माणूस. त्यामुळे संस्थेत येताच त्यांनी अगदी सर्वसामान्य माणूसही बालकल्याण संकुलासारख्या संस्थेत आणला आणि संस्थेच्या कामात स्वतःला झोकून दिले.

हेही वाचा- कोल्हापुरात आहे प्रदूषणमुक्तीचे आदर्श मॉडेल; धुण्याची चावी, तलाव

एखादी गोष्ट करायची म्हटलं की असेल त्या वाहनाने तत्काळ बाहेर पडणे आणि कामाला लागणे, ही त्यांची खासियत. संस्थेतील मुला-मुलींच्या लग्नातील त्यांची लगीनघाई तर साऱ्यांनाच प्रेरणा द्यायची. संस्थेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या कामातही त्यांचे मोठे योगदान राहिले. एकूणच काय तर मुलांचे लग्नाचे वय कमी करण्या विरोधातले आंदोलन असो, देवदासी, जटा निर्मूलनाचे काम असो किंवा अगदी कुठल्याही गरजूला मदतीसाठी या माणसाने सतत सक्रीय पुढाकार घेतला आणि आजही या साऱ्या स्मृती सर्वांनाच काम करण्याची नवी उमेद देतात.

माजी महापौर भिकशेठ पाटील म्हणजे लढवय्या कार्यकर्ता. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राबरोबरच विविध वंचित घटकांसाठीच्या चळवळीत ते सतत अग्रेसर राहिले. यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त...
- सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former mayor bhikshet patil story by kolhapur