आम्हाला कोरंटाईन करा, जेवण द्या ; कणेगाव नाक्यावर अडकलेल्या नागरिकांची आर्त हाक..

सुनील कोंडुसकर
बुधवार, 20 मे 2020

प्रशासनाने पाण्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही सोय केलेली नाही.

चंदगड - लॉक डाऊनमुळे शहरात उपाशीपोटी मरण्यापेक्षा गाव गाठलेला बरा असा निर्णय घेऊन रस्त्याने चालत निघालेल्या सुमारे चाळीस जणांना कोल्हापूर व सांगली च्या सीमेवर कणेगाव नाक्यावर अडवण्यात आले आहे. गेले तीन दिवस रस्त्याकडेच्या शेतवडीत उपाशीपोटी असलेल्या या नागरिकांनी प्रशासनाने आम्हाला रीतसर कोरंटाईन करावे व जेवण द्यावे अशी आर्त हाक दिली आहे. अडकलेल्या नागरिकात चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे वीस जणांचा सहभाग आहे.

 झाडाखालीच घेतलाय आसरा

मूळचा चंदगड तालुक्यातील सुरुते येथील कृष्णा कांबळे हा तरुण सातारा जिल्ह्यात नोकरी करत होता. लॉक डाऊनमुळे काम बंद झाले. पुन्हा काम सुरू होईल या अपेक्षेने तो तिथेच थांबून राहिला. मात्र कालावधी वाढत चालला. शिल्लकीचे पैसे संपल्यामुळे उपासमार सुरू झाली. त्यामुळे गावाकडे जायचे निर्धाराने त्याने प्रशासनाकडे परवानगी मागितली. तीही त्याला वेळेत मिळाली नाही. त्यामुळे त्याने चालतच गाव गाठण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांपूर्वी तो कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आला असता पोलिसांनी त्याला अडवले. कोल्हापूर जिल्ह्यात जाण्याचा परवाना नसल्यामुळे त्याला तिथेच रोखण्यात आले. त्याच्याबरोबर आणखीही काही नागरिकांना आधीपासून अडवले होते. त्यात महिलाही आहेत. राहण्याची व्यवस्था नाही. गेले तीन दिवस तो आणि इतर सर्वजण झाडाखाली राहताहेत.

वाचा - कोल्हापुरात कोरोनाबाधिताचा 'तो' मृतदेह... स्मशानभूमीत ना नातेवाईक ना हुंदक्यांचा आवाज... सगळं काही भयाण...

प्रशासनाने पाण्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही सोय केलेली नाही. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना विनंती करून ते त्यांच्याकडून काही मिळेल ते खाऊन भूक भागवत आहेत. आम्हाला कोरंटाईन करावे व जेवणाची व्यवस्था करावी अशी आर्त हाक हे नागरिक देत आहेत. त्यांच्या या हाकेने प्रशासनाच्या हृदयाला पाझर फुटणार का हे बघावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty people have been detained at Kanegaon Naka on the border of Kolhapur and Sangli