इचलकरंजीत एकाच दिवशी चौघांचा मृत्यू ; रुग्ण संख्या दीड शतक पार

पंडित कोंडेकर
बुधवार, 15 जुलै 2020

शहरात कोरोनाचे आतापर्यंत तब्बल 14 बळी गेले आहेत. 

इचलकरंजी (कोल्हापूर)  : शहरात कोरोना संसर्गाने एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. खंजीरे इस्टेटमधील 83 वर्षीय वृध्द, कापड मार्केट हौसिंग सोसायटीतील 60 वर्षाच्या वृध्दा, सोलगे मळा येथील 75 वर्षीय वृध्द व गोंधळी गल्लीतील 40 वर्षीय महिला यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे शहरात कोरोनाचे आतापर्यंत तब्बल 14 बळी गेले आहेत. 

दरम्यान, दिवसभरात नव्याने 21 रुग्ण आढळून आले. गणेशनगर येथील एकाच कुटुंबातील 9 जणांसह याच परिसरातील एका उद्योजकाचा अहवाल पॉजीटीव्ह आला आहे. मोेठे तळे परिसरातील शिव भोजन केंद्र चालकही बाधीत झाला असून शहरात आतापर्यंत रुग्णांची संख्या दीड शतक पार केली असून संख्या 154 वर पोहचली आहे.  

हेही वाचा- फेसबुकवरून मैत्री झाली आणि चुना लावून गेली

तब्बल 21 जणांचा अहवाल पॉझीटिव्ह 

शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे.  काल लाखेनगरमधील एकाचा कोरोनांने मृत्यू झाला होता.  तर मृत्यूची मालिका सुरुच राहिली. सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असतांना खंजीरे इस्टेटमधील वृध्दाचा मृत्यू झाला. त्याचा दोन दिवसांपूर्वी अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यांनतर कापड मार्केटमधील वृध्देचाही सीपीआरमध्ये उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून ही वृध्दा आजारी होती. दम्याचा त्रास होता. तसेच न्युमोनिया झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला कोरोना झाल्याचे निदान झाले.

हेही वाचा- पंचगंगा स्मशानभूमीत 16 कोविड योद्धे 24 तास कार्यरत
वाचा सविस्तर...

 

सांयकाळच्या सत्रात महिलेसह दोघांचा आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांच्या स्वॅबचा अहवाल मृत्यूनंतर आला. यातील सोलगे मळ्यातील वृध्दाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला सांयकाळी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र कांही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याला दम्याचा त्रास होता. त्याच प्रमाणे वार्ड नंबर 7, गोंधळी गल्लीतील महिलेचाही आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे दिवसभर एकूण चौघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा-एसटीचे कर्मचारी, सावकाराच्या दारी, अवस्था बिकट; पगार नाहीच, गावी जाण्यासही मिळेना परवानगी

दिवसभरात तब्बल 21 नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये गणेशनगरमधील एकाच कुटुंबातील 9 जणांचा समावेश आहे. यापूर्वी या कुटुंबातील सहाजणांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. याशिवाय मोठे तळे येथील शिवभोजन थाळी केंद्र चालक बाधीत झाला आहे. गणेशनगरमधील उद्योजकासह जूना चंदूर रोडवरील दोघांचा, सोलगे मळ्यातील 25 वर्षीय महिला, बंडगर माळमधील 75 वर्षीय वृध्द, गणेशनगरमधील महिला, खंजीरे मळ्यातील व्यापारी व विकासनगरमधील एकाचा समावेश आहे. यामुळे शहरात रुग्णांच्या संख्येने दीड शतक पार केले आहे. तर आतापर्यंत 47 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four corona patient died on the same day in Ichalkaranji